विदर्भाची गाडी कधी येणार रुळावर ?
By admin | Published: July 9, 2014 01:06 AM2014-07-09T01:06:16+5:302014-07-09T01:06:16+5:30
रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात विदर्भाच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार घडला असून अर्थसंकल्पात एकही महत्त्वाचा प्रकल्प विदर्भासाठी जाहीर करण्यात न आल्यामुळे
अपेक्षा भंग : एकही नव्या प्रकल्पाची घोषणा नाही
नागपूर : रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात विदर्भाच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार घडला असून अर्थसंकल्पात एकही महत्त्वाचा प्रकल्प विदर्भासाठी जाहीर करण्यात न आल्यामुळे विदभार्ची गाडी कधी रुळावर येणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
मागील रेल्वे अर्थसंकल्पात रेल नीर बॉटलिंग प्लॉन्टची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार प्रवाशांना स्वच्छ आणि स्वस्त दरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था रेल्वे करून देणार असल्यामुळे हा प्रकल्प प्रवाशांसाठी महत्त्वाचा ठरला आहे. याशिवाय रेल्वेगाड्यात प्रवाशांना पुरविण्यात येणाऱ्या चादर, बेडशीट स्वच्छ धुण्यासाठी मेकॅनाईज्ड लॉन्ड्रीची घोषणा करण्यात आली होती. नागपूर-सेवाग्राम थर्डलाईनच्या कामालाही मंजुरी दिल्यामुळे भविष्यात नागपूरला नव्या रेल्वेगाड्या मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टिममुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लावण्याची घोषणाही करण्यात आली होती. यात अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरा रेल्वेस्थानकावर बसविण्यात येणार आहेत. परंतु रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी आपल्या पहिल्याच रेल्वे अर्थसंकल्पात विदर्भाला ठेंगा दाखविण्याचा प्रकार केला आहे. विदर्भाच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन नेहमीच देण्यात येते. त्यामुळे या अर्थसंकल्पात विदर्भासाठी एखादा मोठा प्रकल्प सुरू करण्यात येईल, अशी अपेक्षा होती.
परंतु एकही प्रकल्प विदर्भाला न दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विदर्भात एखादा मोठा प्रकल्प जाहीर केल्यास विदर्भातील बेरोजगारी दूर होण्याची शक्यता होती. परंतु विदर्भाचा कुठलाच विचार न केल्यामुळे हा अर्थसंकल्प वैदर्भियांच्या अपेक्षा भंग करणारा ठरला आहे. (प्रतिनिधी)