विधान परिषदेतील कोंडी सोमवारी सुटणार ?
By admin | Published: December 12, 2015 12:22 AM2015-12-12T00:22:15+5:302015-12-12T00:22:15+5:30
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून शुक्रवारी सलग पाचव्या दिवशी विधान परिषदेत गोंधळाचे वातावरण कायम राहिले. सरकारने अगोदर कर्जमाफीची घोषणा करावी
योगेश पांडे, नागपूर
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून शुक्रवारी सलग पाचव्या दिवशी विधान परिषदेत गोंधळाचे वातावरण कायम राहिले. सरकारने अगोदर कर्जमाफीची घोषणा करावी, मगच कामकाज होईल हा विरोधकांचा पवित्रा कायम होता व हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात परिषदेत कुठलेही उल्लेखनीय काम झाले नाही. दरम्यान, सोमवारी परिषदेत निर्माण झालेली कोंडी सुटू शकते. यासंदर्भात स्वत: सभापती पुढाकार घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून सातत्याने सभागृहात शेतकरी कर्जमाफीचीच मागणी उचलून विरोधी पक्षांकडून गोंधळ घालण्यात येत आहे. त्यामुळे पहिल्या आठवड्यात केवळ तीन प्रश्नांवर उपप्रश्न विचारण्याची सदस्यांना संधी मिळाली. तर या काळात एकाही लक्षवेधीवर चर्चा होऊ शकली नाही. शेतकरी कर्जमाफीवर सरकार चर्चेला तयार आहे.
त्यामुळे या मुद्यावरून होणारा गदारोळ थांबावा व दुसऱ्या आठवड्यात कामकाज सुरळीत चालावे व पहिल्या आठवड्याचा ‘बॅकलॉग’ भरून निघावा अशी विनंती सत्तापक्षातर्फे सभापती रामराजे निंबाळकर-नाईक यांच्याकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात सभापती स्वत: पुढाकार घेण्याची शक्यता आहे व सोमवारी त्यांच्या दालनात सत्तापक्ष नेते, विरोधी पक्षनेते तसेच इतर पक्षाच्या गटनेत्यांची बैठक होणार असून यात ही कोंडी दूर होईल. वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांनादेखील या बैठकीत बोलविण्यात येईल, अशी माहिती एका पक्षाच्या गटनेत्याने गोपनीयतेच्या अटीवर दिली.
दरम्यान, शुक्रवारीदेखील विरोधकांचा आक्रमक पवित्रा कायमच होता. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, शेकापचे जयंत पाटील, जोगेंद्र कवाडे यांनी कर्जमाफीची मागणी लावून धरली. यादरम्यान विरोधकांच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज पहिले अर्धा तास, २० मिनिटे, १५ मिनिटे, १ तास असे ४ वेळा तहकूब करण्यात आले. अखेर अशासकीय कामकाज आटोपून सभापतींनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.