मतांची हंडी फुटणार का?
By admin | Published: August 26, 2016 04:38 AM2016-08-26T04:38:20+5:302016-08-26T04:38:20+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हिरमोड झालेल्या गोविंदा पथकांना राजकीय हंड्यांमुळे दिलासा मिळाल्याचे चित्र गुरूवारी अनुभवायला मिळाले.
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हिरमोड झालेल्या गोविंदा पथकांना राजकीय हंड्यांमुळे दिलासा मिळाल्याचे चित्र गुरूवारी अनुभवायला मिळाले. न्यायालयाने २० फूटांची मर्यादा घातल्यानंतरही आगामी निवडणुका पाहता बहुतेक राजकीय पक्षांच्या आयोजकांनी चार ते पाच थर लावणाऱ्या पथकांवरही बक्षिसांची लयलूट केली. त्यामुळे मतांचा जोगवा मागणाऱ्या राजकीय पक्षांमुळे मरणपंथाला टेकलेल्या छोट्या पथकांना उभारी मिळाली आहे.
गेल्या दोन वर्षांपर्यंत चार ते पाच थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना आयोजक उभे करत नव्हते. मात्र आधी उच्च न्यायालय आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे थरांची उंची २० फूटांपर्यंत आली. मात्र मुंबईत काहीच महिन्यांनंतर महापालिका निवडणूक होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या तंबीमुळे भाजप वगळता महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या प्रमुख पक्षांनी बऱ्याच ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केल्याचे निदर्शनास आले. एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी काही ठिकाणी चार
ते पाच थरांसाठी हजारो रुपयांची पारितोषिके देण्यात येत होती. तर काही ठिकाणी उंची आणि वयाची मर्यादा ओलांडून गोविंदा पथकांना थर रचण्याची परवानगी दिल्याचे दिसले.
>येथे फुटल्या मतांच्या हंड्या
कुर्ला पश्चिमेकडील शीतल सिग्नलगत महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे उभारण्यात आलेल्या हंडीला शहरासह उपनगरातील गोविंदा पथकांनी यशस्वी सलामी दिली.
प्रभादेवी नाक्यावर दक्षिण मध्य मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीने महिला दहिहंडी (गोपिका) दहिकाला उत्सवाचे आयोजन केले होते.
नवी प्रभादेवी मार्गावरील सह्याद्री चौकात शिवसेना आणि मनसे शाखा क्र. १८६ या दोन राजकीय पक्षांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. त्यामुळे सकाळपासूनच गोविंदा पथकांसह विभागातील गोविंदा रसिकांनी या ठिकाणाला वेढा दिला होता.
अंधेरी पश्चिमेकडे मनसे प्रभाग क्रमांक ६२ तर्फे गोविंदा पथकांना १ लाख रुपयांचे रोख पारितोषिक ठेवण्यात आले होते. चार आणि पाच थरांची सलामी देणाऱ्या पथकांना यावेळी हजारो रुपयांची पारितोषिके देण्यात आली.
गोरेगाव पूर्वेकडे मनसेने आयोजित केलेल्या उत्सवामध्ये गोविंदा पथकांना ४ किंवा ५ थर लावण्याची मर्यादा होती. याठिकाणी १८ वर्षांखालील बालगोविंदांना थरावर चढण्यास मनाई करण्यात आली.
गोरेगाव पूर्वेकडील सोनावाला मार्गावर शिवसेना प्रणित मुंबई फेरीवाला सेनेतर्फे ३३ हजार ३३३ रुपये रक्कमेची दहीहंडी आयोजित केली होती.