काश्मीरची लढाई जिंकणार काय? उद्धव ठाकरेंचा अमित शहांना सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2017 10:03 AM2017-06-19T10:03:54+5:302017-06-19T11:18:41+5:30

प्रत्येक निवडणुका तुम्ही जिंकाल व टिकाल, पण काश्मीरची लढाई जिंकणार काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे

Will win the battle of Kashmir? The question of Uddhav Thackeray's Amit Shahna | काश्मीरची लढाई जिंकणार काय? उद्धव ठाकरेंचा अमित शहांना सवाल

काश्मीरची लढाई जिंकणार काय? उद्धव ठाकरेंचा अमित शहांना सवाल

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - महाराष्ट्रातील मध्यावधीचे काय व्हायचे ते होईल, अमित शहा म्हणतात त्याप्रमाणे मध्यावधीनंतर त्यांचेच सरकार येईल. त्यांना हवा तो राष्ट्रपती होईल. प्रत्येक निवडणुका तुम्ही जिंकाल व टिकाल, पण काश्मीरची लढाई जिंकणार काय? जवानांचे प्राण वाचतील काय? काश्मीर देशाच्या नकाशावर जवानांच्या बलिदानाशिवाय टिकेल काय? असे सवाल सामना संपादकीयच्या माध्यमातून विचारत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तरं मागितली आहेत. 
 
राजकारणातील लढाया म्हणजे निवडणुका या जिंकण्यासाठीच असतात. त्यामुळे उद्या महाराष्ट्रात मध्यावधी झालीच तर ती जिंकण्याची भाषा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे. अमित शहा व त्यांच्या पक्षाला मध्यावधी निवडणुका जिंकण्याचे वेध लागले आहेत व आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहोत. अर्थात मध्यावधीचे काय होणार यापेक्षा आम्हाला चिंता आहे ती काश्मीरचे काय होणार? हिंसेच्या वणव्यात जळत असलेल्या दार्जिलिंगचे काय होणार? आमच्या भूमीवरील हे दोन्ही स्वर्ग आज हिंसा व दहशतवादाने खाक होताना दिसत आहेत अशी खंत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे.  
 
अनंतनाग जिल्ह्यात पोलीस पार्टीवर हल्ला करून सात पोलिसांना ठार करण्याचे भेकड कृत्य अतिरेक्यांनी केले आहे. पोलीस व जवान यांच्या हौतात्म्यांचे आकडे मोजायचे तरी किती, हा प्रश्न आमच्यापुढे आहे. त्याचवेळी महाराष्ट्रातील सरकारचे काय होणार, हा प्रश्न काहींना महत्त्वाचा वाटत आहे. महाराष्ट्रातील सरकारचा टेकू काढून घेतला तर पाठिंब्यासाठी पाच-पंधरा डोकी विकत घेऊन सरकार टिकविण्याची धडपड समजण्यासारखी आहे. फडणवीस यांचे सरकार पाच वर्षांसाठी टिकेलच टिकेल अशी ग्वाही अमित शहा यांनी दिली आहे, पण देशाच्या नकाशावर कश्मीर टिकेल काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. 
 
महाराष्ट्रात शिवसेना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जोरकस भूमिका घेते. राष्ट्रीय प्रश्नांवर स्वतंत्र व देशाच्या स्वाभिमानाचे मत मांडते म्हणून शिवसेनेस धडा शिकविण्याचे डावपेच आखले जातात, पण काश्मीरात ‘अराष्ट्रीय’ भूमिका घेणाऱ्यांच्या पाठीशी भाजप समर्थपणे उभी आहे. मेहबुबांच्या बेलगाम अराष्ट्रीय वक्तव्यांवर ‘ब्र’ काढण्याची हिंमत परिवारातील लोक दाखवत नाहीत. कश्मीर टिकायला हवं. महाराष्ट्राचे सरकार हे प्राधान्य असता कामा नये असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
आश्वासनांच्या टोप्या लावून व या बोटावरील थुंकी त्या बोटावर करून ते टिकवले जाईलही, पण काश्मीर कसे टिकविणार आहात? आताच काश्मीर खोऱ्यात १४४ कलम लागू केले आहे. लष्करी तळांवर, सुरक्षा दलाच्या ताफ्यांवर हल्ले होत आहेत. अतिरेक्यांचे एन्काऊंटर होताच काश्मीरात उठाव होत आहेत. लश्कर-ए-तोयबा, अल कायदा, इसिस व आयएसआय यांनी कश्मीर खोऱ्यावर नियंत्रण मिळवले असेल तर महाराष्ट्रातील सत्तेची चिंता सोडून या मंडळींनी आपल्या माना काश्मीरकडे वळवायला हव्यात असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं आहे. 
 
काश्मीर व दार्जिलिंग येथे हिंसाचार भडकला आहे. काश्मीरात अतिरेक्यांचा उच्छाद आहे तर दार्जिलिंग येथे स्वतंत्र ‘गोरखालॅण्ड’साठी हिंसक आंदोलन सुरू आहे. परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. दार्जिलिंग येथे पोलिसांबरोबर निरपराध्यांचे बळी गेले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आंदोलकांशी चर्चा करण्याची तयारी दाखवूनही ते ऐकायला तयार नाहीत. आंदोलकांकडे सर्व प्रकारची हत्यारे आहेत. ईशान्येकडील उग्रवाद्यांकडून दार्जिलिंगमधील आंदोलकांना पाठबळ मिळत आहे व हा प्रकार गंभीर आहे. ममता बॅनर्जी यांच्याशी राजकीय मतभेद असू शकतात, पण दार्जिलिंगच्या पेटलेल्या होळीवर कोणी राजकीय पोळी भाजू नये इतकीच आमची अपेक्षा आहे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
 

 

Web Title: Will win the battle of Kashmir? The question of Uddhav Thackeray's Amit Shahna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.