सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 06:51 PM2024-11-04T18:51:35+5:302024-11-04T18:52:22+5:30
बंडखोर उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली किंवा कायम ठेवल्याने आता सर्वच मतदारसंघातील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. माहीम मतदारसंघात ...
बंडखोर उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली किंवा कायम ठेवल्याने आता सर्वच मतदारसंघातील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. माहीम मतदारसंघात शिंदे सेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांच्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव होता. अशातच आज सरवणकरांनी अमित ठाकरेंची उमेदवारी मागे घेण्यासाठी राज ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्न केला. याला राज यांनी नकार कळविल्याने आता माहीममध्ये तिरंगी लढत होणार आहे. यावरून आता भाजपा काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना नारायण राणे यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
या निवडणुकीत महायुतीकडून सर्वच चांगले उमेदवार दिले आहेत. महायुतीचे सरकार परत येईल असा माझा विश्वास आहे. वैभव नाईक यांनी इकडे काही केलेले नाही. नाईक शिंदेंकडे रोज हजेरी लावायचे आणि यांना निष्ठावान म्हणायचे, असा टोला राणे यांनी लगावला.
मनोज जरांगे यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला असल्याचे राणे जरांगेंच्या माघारीवर म्हणाले. तसेच सदा सरवणकरांचा प्रचार करणार की ठाकरेंचा या सवालावर राणे यांनी आमचा जो उमेदवार असेल त्याचे आम्ही काम करणार आहोत, असे राणे यांनी स्पष्ट केले.
सिंधुदुर्गात नरेंद्र मोदी आणि योगी यांच्या दौऱ्याची आम्ही मागणी केली आहे. आज सायंकाळपर्यंत याचे पत्र येईल, असे राणे म्हणाले.