गाणार जाणार की येणार? काँग्रेस पहिल्यांदाच मैदानात
By admin | Published: January 25, 2017 02:57 AM2017-01-25T02:57:03+5:302017-01-25T02:57:03+5:30
नागपूर शिक्षक मतदारसंघात कोण निवडून येणार? विद्यमान आमदार नागो गाणार जाणार की पुन्हा येणार, कॉँग्रेसचे अनिल शिंदे मैदान मारणार की,
जितेंद्र ढवळे / नागपूर
नागपूर शिक्षक मतदारसंघात कोण निवडून येणार? विद्यमान आमदार नागो गाणार जाणार की पुन्हा येणार, कॉँग्रेसचे अनिल शिंदे मैदान मारणार की, शिवसेनेचे प्रकाश जाधव महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या गडाला धक्का देणार? अशा राजकीय गप्पांचा फड सध्या नागपूर विभागातील शाळांमधील स्टाफ रूममध्ये रंगतो आहे.
३४,९८७ शिक्षक मतदार असलेल्या या मतदार संघात ३ फेब्रुवारीला मतदान होईल. एकूण १६ उमेदवारांनी शिक्षकांचे प्रश्न विधानपरिषदेत मांडण्यासाठी या मतदार संघात उडी घेतली आहे. भौगोलिकदृष्ट्या हा मतदारसंघ मोठा असला, तरी विजयाचा इतिहास नागपूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या कलासोबतच राहिला आहे. नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक १४,९८७ मतदार आहेत. त्यामुळे नागपूरकर गाणार जाणार की येणार, याकडे लक्ष लागले आहे. भाजपाचा पाठिंबा असलेल्या राज्य शिक्षक परिषदेचे नागो गाणार उमेदवार आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाणार यांच्यासाठी मतांची फिल्डिंग लावली आहे. मात्र, गाणार यांना भाजपा आणि संघ परिवारातून फटाके लागले आहेत. संघ परिवारातील संजय बोंदरे आणि वर्धा येथील शिक्षक परिषदेशी जवळीक असलेले शेषराव बिजवार यांनी स्वबळाचा नारा दिला असल्याने गाणार यांच्या मतांचे गणित बिघडणार आहे.
शिवसेनाप्रणीत शिक्षक सेनेने या मतदार संघात दंड थोपटले आहे. सेनेतर्फे रामटेकचे माजी खासदार प्रकाश जाधव मैदानात आहेत, तर काँग्रेसने चंद्रपूरचे प्रा. अनिल शिंदे यांना मैदानात उतरविले आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शिंदे यांच्यावर एकाएकी विश्वास टाकल्याने नागपूर जिल्हा काँग्रेस सेलमधील काही पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थतता आहे. निष्ठावंतांना संधी का नाही? असा सवाल सेलच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे केला आहे. मात्र, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस प्राचार्य बबनराव तायवाडे यांचे निष्ठावंत असलेल्या शिंदे यांच्यासाठी तायवाडेंची यंग टीचर्स असोसिएशन कामी लागली आहे. चंद्रपुरातील ५,६३८ मतदारापैकी ६० टक्के मते मिळाली की, तायवाडे नागपुरात ताकद लावतील, असा शिंदे यांचा तर्क आहे.
काँग्रेसी विचार असलेले
शिक्षक आजवर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या (विमाशि) उमेदवारासोबत राहायचे. मात्र, या वेळी विमाशि आणि काँग्रेस समोरासामोर आहे. विमाशिचे आनंद कारेमोरे यांचा शिंदे यांना फटका बसेल की, विजयाचे गणित सोपे होईल, हे लवकरच स्पष्ट होईल.