'तुमच्या दैनंदिन अडचणी नरेंद्र मोदींना सांगणार का?' राज ठाकरेंचा मतदारांना सवाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 09:17 PM2024-11-10T21:17:46+5:302024-11-10T21:18:52+5:30

'निवडून आल्यानंतर हे तुमच्याकडे बघत सुद्धा नाहीत', बोरीवलीतून राज ठाकरे कडाडले

Will you share your daily problems with Narendra Modi? Raj Thackeray's question to the voters... | 'तुमच्या दैनंदिन अडचणी नरेंद्र मोदींना सांगणार का?' राज ठाकरेंचा मतदारांना सवाल...

'तुमच्या दैनंदिन अडचणी नरेंद्र मोदींना सांगणार का?' राज ठाकरेंचा मतदारांना सवाल...

प्रविण मरगळे
Raj Thackeray :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आपल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करत आहेत. दिवसभरात राज ठाकरेंच्या तीन-चार सभा पार पडत आहेत. दरम्यान, आज बोरिवलीत त्यांची सभा पार पडली. सायंकाळी 7 च्या सुमारास राज ठाकरे यांचे सभा स्थळी आगमन झाले. या सभेनंतर राज ठाकरेंची वर्सोवा, प्रभादेवी येथे सभा आहे. बोरिवली येथील सभेत 45 मिनिटे भाषण केल्यानंतर राज ठाकरे सभा आटोपून जाणार होते, तेवढ्यात वर्सोवा येथून पदाधिकाऱ्यांचा राज ठाकरे यांना फोनवरुन निरोप आला. वर्सोवा येथील सभेत राज यांचे बोरिवलीतील भाषण मोठ्या मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आले. त्यानंतर राज ठाकरे यांनी बोरिवली येथील भाषण आणखी 15 मिनिटे वाढवले.

या सभेततून राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा नागरी समस्यांवरुन सरकारवर टीका केली. उमेदवार आता गल्लोगल्लीत, घराघरापर्यंत प्रचारासाठी फिरत आहेत. पण निवडून आल्यानंतर हेच उमेदवार 5 वर्षे नागरिकांकडे मागे फिरुन पाहत नाहीत. हेच राज ठाकरेंनी आपल्या भाणषातून मांडले. 'मुंबईच्या ट्रॅफिकमधून कसाबसा मार्ग काढत काढत मी इथपर्यंत पोहोचलो. दिवसाला तीन-तीन, चार-चार सभा सुरू आहेत. मी आलो आहे ते तुमच्या सर्वांचं दर्शन घेण्यासाठी आणि सहज चार गोष्टी सांगण्यासाठी. मला बोरवलीला सभा घ्यायचीच होती, ते यादीमध्ये नव्हतं, पण मी इथे तुमच्यासाठी आलो. मी बोरीवली मतदारसंघासाठी अत्यंत सभ्य उमेदवार दिलेला आहे. जाणीव असलेला, अभ्यास असलेला उमेदवार दिला आहे', असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. 

ते पुढे म्हणतात, 'आज काही पक्षांचे जाहीरनामे आले. 20 वर्षांपूर्वी सांगितलेल्या गोष्टी आजसुद्धा त्यांच्या जाहीरनाम्यात होत्या. काँग्रेसने काही बोलायचे ठेवले नाही. एका बाजूला प्रगती झाली म्हणायचे अन् दुसऱ्या बाजूला जुनी बोरिवली चांगली होती वाटते. कसलीही यंत्रणा लावलेली नाही, बाहेरुन माणसं येत आहेत. एखादं शहर म्हटलं तर ठीक आहे, माणसं येणं स्वाभाविक आहे, पण जे मूळ आहे, त्यांना त्रास व्हायला लागला आहे. फुटपाथवर चालता येईना, रस्त्यावर गाड्या चालवता येईना, मैदानावर बागा उरल्या नाहीत. मग कोणती डेव्हलपमेंट झाली?'

'प्रत्येकाला घरातून बाहेर पडल्यावर बरं वाटलं पाहिजे, पण शहरात तसं काहीच वाटत नाही. आपले शहर बॉम्ब टाकल्यासारखे का वाटतात? काहीही चालतंय. फुटपाथ तुटले, रस्ते नाहीत, खड्डे आहेत. याचे कारण म्हणजे आपल्याला नक्की काय पाहिजे, याची कल्पना तुम्हाला नाही आणि राजकारण्यांना तर नाहीच नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड किल्ले पाहिले तर तुम्हाला आर्किटेक्चर नावाची गोष्ट कळेल. शहरांना एक कॅरेक्टर लागतं. राजकारण्यांनाच कॅरेक्टर उरले नाही, तर शहरांना कुठून येणार? त्यांचे आपल्याकडे लक्ष नाही, कारण आपण त्यांना प्रश्न विचारत नाहीत, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

'आतापर्यंत जे-जे आमदार, खासदार होऊन गेले, त्यांना एकदा प्रश्न विचारा. निवडणूक आल्यावर हात जोडतात, पाया पडतात आणि निवडणुका झाल्या की, पाच वर्षे तुमच्याकडे बघत सुद्धा नाहीत. तुम्ही प्रश्न विचाराल अशी त्यांना भीती वाटली पाहिजे. पण त्यांना भीतीच उरली नाही. चांगल्या जातीचा, चांगल्या पक्षाचा असा आपण मतदान करतो. पण हा चांगलं काम करतो की, नाही यावर आपण मतदान करत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर मतं मागायला येतात. पण, आता बाळासाहेब ठाकरे नाहीत अन् बोरिवलीमधील प्रश्न नरेंद्र मोदींना कसे सांगायचे? पाच वर्षे कशाला म्हणतात कळत का?', असा सवालही राज ठाकरेंनी यावेळी उपस्थितांना केला.

Web Title: Will you share your daily problems with Narendra Modi? Raj Thackeray's question to the voters...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.