अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? महाराष्ट्राचे 3 शत्रू सांगत संजय राऊत राज ठाकरेंबद्दल हे काय बोलले?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 01:24 PM2024-09-17T13:24:26+5:302024-09-17T13:25:46+5:30
अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवली तर, शिवसेना (उबाठा) सहकार्य करणार का? असे विचारले असता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत थेट राज ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला आहे...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एवढेच नाही, तर पक्षाच्या बैठकीत, पक्षातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनीही निवडणूक लढवायला हवी, असे मतही व्यक्त केले होते. यानंतर आता, अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवली तर, शिवसेना (उबाठा) सहकार्य करणार का? असे विचारले असता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत थेट राज ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला आहे.
अमित ठाकरे यांच्या विधानसभा निवडणूक लढवण्याच्या भूमिकेकडे कसे बघता? असे विचारले असता राऊत म्हणाले, "हे बघा लोकशाही आहे. त्यांचा एक पक्ष आहे. त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष त्यांचे वडील आहेत. त्यांच्या पक्षाने जो निर्णय घेतला असेल निवडणूक लढवण्याचा तर त्या निर्णयावर मी कशासाठी व्यक्त व्हायचे? अमित ठाकरे हे एक तरुण नेते आहेत. ते त्या पक्षाचे एक महत्वाचे नेते आहेत आणि त्यांना निवडणूक लढवण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर त्यांच्या पक्षाचा अथवा कुटुंबाचा तो निर्णय असेल, तर त्याकडे बघताना आम्ही म्हणू की, एक तरुण मुलगा राजकारणात येतोय."
यावर, जेव्हा आदित्य ठाकरे यांनी वरळीत निवडणूक लढवली, तेव्हा सर्वच राजकीय पक्ष प्रामुख्याने मनसेने सहकार्य केले होते. त्या मतदारसंघात उमेदवार दिला नही, अशा वेळी आता अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवली तर, शिवसेना (उबाठा) सहकार्य करणार का? असा प्रश्न विचारला असता, राऊत म्हणाले, "खरे तर ते भारतीय जनता पक्षासोबत आहेत. त्यांचा पक्ष भारतीय जनता पक्षा अथवा शिंदे गटासोबत आहे. हे आपण लक्ष्यात घ्यायला हवे. राज ठाकरे कधीही स्वबळावर लढत नाहीत. ते एकतर शिवसेनेला विरोध करणाऱ्या, म्हणजेच महाराष्ट्राला विरोध करणाऱ्या लोकांसोबत असतात. हा आतापर्यंतचा आमचा अनुभव आहे."
राऊत पुढे म्हणाले, "महाराष्ट्राला कमकुवत करणाऱ्या ज्या शक्ती आहेत. त्यात महाराष्ट्राचे जे तीन शत्रू आहेत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट, आणि राष्ट्रवादी अजित पवार गट, हे तिन्ही महाराष्ट्राचे शत्रू आहेत, या तिन्ही शत्रूंना जे अप्रत्यक्षपणे मदत करतात, ते सुद्धा महाराष्ट्राचे शत्रू होऊ शकतात. मुळात, कोण निवडणूक लढतंय हे त्याने स्वतः जाहीर करायला हवे. वृत्तपत्रातील बातम्यांवरू आम्हाला भूमिका ठरवता येणार नाही."