लहान भाऊ की विरोधी व्हायचे?
By admin | Published: October 20, 2014 05:28 AM2014-10-20T05:28:37+5:302014-10-20T05:28:37+5:30
मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात गेली २५ वर्षे भाजपाचा मोठा भाऊ म्हणून वावरलेल्या शिवसेनेचा दरवाजा १५ वर्षांनंतर सत्ता ठोठावत आहे
संदीप प्रधान, मुंबई
मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात गेली २५ वर्षे भाजपाचा मोठा भाऊ म्हणून वावरलेल्या शिवसेनेचा दरवाजा १५ वर्षांनंतर सत्ता ठोठावत आहे. सत्तेकरिता दार उघडले तर लहान भाऊ होऊन मंत्रालयात बसावे लागणार आहे अन्यथा विरोधी बाकावर वाघासारखे बसून सत्ताधारी भाजपावर गुरकावण्याची संधी आहे. यापैकी एक पर्याय शिवसेनेला स्वीकारायचा आहे.
शिवसेना गेली १५ वर्षे सत्तेत नसल्याने येणाऱ्या सत्तेला दार उघडावे, अशी त्या पक्षातील अनेकांची अपेक्षा आहे. मात्र विधानसभा निवडणुकीतील अंकगणित पाहता शिवसेनेला मंत्रालयात लहान भावाची भूमिका निभवावी लागेल. कमी महत्त्वाच्या खात्यांवर व पदांवर समाधान मानावे लागेल. आतापर्यंत शिवसेनेने रिमोट कंट्रोल चालवायचा आणि भाजपाच्या मंत्र्यांनी मातोश्रीवर पायधूळ झाडायची, असा शिवसेनेचा रौब होता. यापुढे तसे होणार नाही, हे वास्तव पचवून सरकारमध्ये बसायची तयारी करावी लागेल. पाच वर्षे लहान भाऊ राहून सत्ता उपभोगली तर पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेनेला आणखी गिळण्याचा प्रयत्न करील. त्यातच शिवसेनेकडे मंत्रिपदाची धुरा सांभाळण्याकरिता सक्षम व्यक्तींची वानवा आहे. त्यामुळे सत्ता घेतल्यावर शिवसेनेचे काही मंत्री आरोपांच्या फैरींमध्ये सापडण्याची भीती आहे. अशावेळी भाजपाकडून पाठराखण केली जाण्याची शक्यता धूसर आहे. शिवसेनेचे सत्तेत घेऊन जेवढे खच्चीकरण करता येईल तेवढे भाजपा करील, अशी भीती आहे.
शिवसेनेने विरोधी बाकावर बसण्याची भूमिका घेतली तर भाजपाला कदाचित राष्ट्रवादीचा किंवा राष्ट्रवादीत फूट पाडून मोठ्या गटाचा पाठिंबा घ्यावा लागेल. यामुळे भाजपावर हल्ला करण्याची संधी शिवसेनेला मिळू शकेल. मात्र त्याकरिताही सक्षम नेतृत्व शिवसेनेकडे नाही. विरोधी पक्षात राहिल्यावर वेगवेगळी आमिष दाखवून शिवसेनेला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न भाजपा करील आणि शिवसेनेच्या नैतिक सामर्थ्याची परीक्षा घेईल, अशी शक्यता आहे.