बाबरी मशिदीची जागा हिंदूंना द्या, मुस्लिमांचे ज्येष्ठ धर्मगुरू मौलाना कल्बे सादिक यांचं आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 06:22 AM2017-08-14T06:22:26+5:302017-08-14T07:01:55+5:30
मुस्लिमांनी त्या जागेवरील आपला दावा सोडून देऊन लाखो देशवासीयांची मने जिंकावीत, असे आवाहन शिया मुस्लिमांचे ज्येष्ठ धर्मगुरू मौलाना कल्बे सादिक यांनी रविवारी येथे केले.
मुंबई : अयोध्या येथील राम जन्मभूमी-बाबरी मशिदीच्या वादात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मुस्लीम समाजाच्या बाजूने लागला, तरी मुस्लिमांनी त्या जागेवरील आपला दावा सोडून देऊन लाखो देशवासीयांची मने जिंकावीत, असे आवाहन शिया मुस्लिमांचे ज्येष्ठ धर्मगुरू मौलाना कल्बे सादिक यांनी रविवारी येथे केले.
वरळी येथील ‘नॅशनल स्पोर्ट्स क्लब आॅफ इंडिया’ येथे ‘अहिंसा विश्व भारती’ या संस्थेतर्फे आयोजित ‘जागतिक शांतता परिषदेत’ ते बोलत होते. अयोध्येतील हा वाद हिंदू व मुस्लीम परस्पर सन्मानाने सोडविण्यावर भर देत, कल्बे सादिक यांनी त्या दृष्टीने शिया समुदायातर्फे हे सलोख्याचे पाऊल टाकले.
मौलाना कल्बे सादिक म्हणाले की, रामजन्मभूमी-बाबरी मशिदीचा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात असून, न्यायालयावर आमचा विश्वास आहे. न्यायालयाचा निकाल मुस्लीम समाजाच्या विरोधात गेला, तरी त्यांनी तो शांततेने मान्य करावा. आपल्या या मताला इस्लामी धर्मशास्त्राचा दाखला देत, कल्बे सादिक म्हणाले की, जो मनापासून दान करतो, त्याला अल्ला काही कमी पडू देत नाही. त्यामुळे सर्वात प्राणप्रिय अशी वस्तू दिल्याने देणाºयाला त्याच्या हजारपटीने परत मिळते. मौलाना कल्बे सादिक शिया पंथियांच्या आॅल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे उपाध्यक्षही आहेत.