वाऱ्याची दिशा बदलली, मुंबईचा पारा ३५ अंशांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 05:56 AM2019-02-06T05:56:10+5:302019-02-06T05:56:43+5:30
उत्तरेसह दक्षिणेकडून वाहणारे वारे म्हणजेच वाºयाची बदललेली दिशा आणि आर्द्रतेमध्ये नोंदविण्यात आलेली वाढ या प्रमुख कारणांमुळे मुंबईच्या हवामानात बदल नोंदविण्यात येत आहेत.
मुंबई - उत्तरेसह दक्षिणेकडून वाहणारे वारे म्हणजेच वाºयाची बदललेली दिशा आणि आर्द्रतेमध्ये नोंदविण्यात आलेली वाढ या प्रमुख कारणांमुळे मुंबईच्या हवामानात बदल नोंदविण्यात येत आहेत. मुंबईच्या किमान आणि कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येत असून, किमान तापमान १९ तर कमाल तापमान ३५ अंशांवर गेले आहे. परिणामी मुंबईकरांना उन्हाचे चटके बसू लागले आहेत. उत्तरोत्तर यात आणखी वाढ नोंदविण्यात येणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
सोमवारी मुंबईचे कमाल तापमान ३५.५ अंश नोंदविण्यात आले आहे. सोमवारसह मंगळवार काहीसा ‘ताप’दायक ठरला असून, मुंबईची आर्द्रता ९४ टक्के नोंदविण्यात आली आहे. मंगळवारचे वातावरण किंचित उष्ण असल्याचे जाणवले. त्यामुळे उकाड्यास सुरुवात झाल्याच्या प्रतिक्रिया मुंबईकरांनी नोंदविल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे रात्री किंचितसा गारवा जाणवत असला तरीदेखील दिवसाचे ऊन मुंबईकरांना त्रासदायक ठरत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. उर्वरित भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. दरम्यान, मुंबई परिसरात मंगळवारी तापमान ३३.३ अंश इतके नोंदवण्यात आले.
नागपूरमध्ये सर्वाधिक गारठा
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात सर्वात कमी किमान तापमान नागपूर येथे ११.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. ६ ते ७ फेब्रुवारी दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. ८ आणि ९ फेब्रुवारी रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.
बदलत्या वातावरणाचा परिणाम
वाºयाची दिशा बदलली आहे. आता उत्तरेसह दक्षिणेकडून वारे वाहू लागले आहेत. महत्त्वाचे म्हणजे मुंबईच्या आर्द्रतेमध्ये वाढ नोंदविण्यात येत आहे. वातावरणातील या प्रमुख बदलामुळे मुंबईच्या किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे.
- शुभांगी भुते, शास्त्रज्ञ, प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई