सुवर्ण संग्रामला हवा मदतीचा हात
By admin | Published: November 6, 2014 09:37 PM2014-11-06T21:37:32+5:302014-11-06T22:05:01+5:30
गुणवंत खेळाडू : मदत न मिळाल्यास नेपाळला जाण्याची संधी हुकण्याची शक्यता
श्रीकांत चाळके - खेड -अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर विविध खेळांमध्ये आपल्या वैविध्यपूर्ण अंगभूत गुणांनी प्राविण्य मिळविणाऱ्या गुणवंत खेळाडूंची संख्या काही कमी नाही. मात्र, घरच्या आर्थिक दुर्बलतेमुळे अशा खेळाडूंना यशोशिखरापासून वंचित राहावे लागते. खेड तालुक्यातील केळणे गावातील संग्राम महेश कदम या गुणवंत खेळाडूच्या बाबतीत हा अनुभव येत आहे़
संग्रामची कीक बॉक्सिंग क्रीडा प्रकारात नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याआधी राज्यस्तरीय ज्युनिअर कीक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण आणि राष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली आहे. संग्रामला आता नेपाळ येथे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवासखर्चाला पैसे नाहीत़ याकरिता त्याला लाखभर रूपये खर्च येणार आहे. घरची परिस्थिती नसल्याने तो हा खर्च करू शकत नाही़ त्यामुळे त्याला मदतीची गरज आहे. खेडचे तहसीलदार प्रकाश संकपाळ यांनी संग्राम व त्याची आई यांचा पुष्पगुच्छ देवून गौरव केला आहे. मात्र, संग्रामचा नुसता गौरव करून चालणार नाही, तर त्याला प्रत्यक्ष मदतीची गरज आहे,़ अन्यथा तो या स्पर्धेपासून वंचित राहणार आहे़
स्ांग्राम कदम याचे पाचवीपर्यंतचे शिक्षण खेड तालुक्यातील आवाशी देऊळवाडी येथील प्राथमिक शाळेत झाले़ नंतर सहावीसाठी तो खेड शहरातील एल. पी. इंग्लिश स्कूलमध्ये दाखल झाला. तिथे शिक्षण घेतल्यानंतर त्याने सातारा जिल्ह्यातील वाई येथील कमांडो ट्रेनिंग स्कूलमध्ये सातवी इयत्तेत प्रवेश घेतला. तिथे त्याची या खेळातील जडणघडण झाली. या विद्यालयाचे प्रशिक्षक कॅप्टन एस़ बी़ खंकाळ, कमांडो एस. पी. जावळे, ए़ एस. कल्याणकर यांनी कीकबॉक्सिंग प्रकारात संग्रामची आवड लक्षात घेता त्याला प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली़ संग्रामने या प्रशिक्षणाचा लाभ घेत आणि प्रशिक्षकांनी दिलेल्या टीप्सचे काटेकोरपणे पालन केले. केवळ सहा महिन्यांच्या काळात राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण आणि राष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक पटकावून प्रशिक्षकांचा विश्वास त्याने सार्थ ठरवला. आई-वडिलांचे परिश्रम आणि हलाखीच्या परिस्थितीतून दिलेले शिक्षण याची जाण ठेवत अवघ्या १६ वर्र्षे वयोगटातील २८व्या ज्युनिअर राज्यस्तरीय कीक बॉक्सिंग स्पर्धेत मिळविलेले हे उत्तुंग यश पाहून आई-वडिलांनाही आपले आनंदाश्रू आवरता आले नाहीत. तरूणाईला संग्रामचे हे यश नक्कीच भूषणावह आहे़
आता त्याचे लक्ष आहे ते नेपाळमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेकडे. लाखभर रूपयांची मदत नाही मिळाली तर संग्रामला या स्पर्धेला मुकावे लागणार आहे़ जिल्ह्यातील सामाजिक संस्थांनी तसेच लोकप्रतिनिधींनी संग्रामला मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.