नवीन पनवेलमध्ये हवा भुयारी मार्ग
By admin | Published: November 19, 2016 02:49 AM2016-11-19T02:49:54+5:302016-11-19T02:49:54+5:30
नवीन पनवेलमधील पोदी येथून जुन्या पनवेलकडे जाण्यासाठी रेल्वे गेट आहे.
पनवेल : नवीन पनवेलमधील पोदी येथून जुन्या पनवेलकडे जाण्यासाठी रेल्वे गेट आहे. येथून महामार्गावरही जवळ पडतो. कायम वर्दळीच्या असलेल्या या मार्गावर पूल अथवा भुयारी मार्ग बांधण्यात यावा, अशी मागणी रहिवाशांच्या वतीने अॅड. मनोज भुजबळ यांनी केली आहे.
नवीन पनवेलमधील सेक्टर १५, १५ ए, पोदी नं. १ व विचुंबे या भागातून राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी पोदी जवळील रेल्वे गेट ओलांडून किंवा एचडीएफसी सर्कलच्या पुलावरून जावे लागते. पुलावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. माथेरान रस्त्याकडून व डीमार्टकडून येणारी वाहतूक याच पुलावरून होते. या भागात लोकवस्तीबरोबरच वाहनांची वर्दळही वाढल्याने पोदीजवळ असलेले रेल्वे गेटचा वापर दिवसेंदिवस धोकादायक ठरत आहे. गेट बंद असूनही अनेक जण खालून सायकल किंवा दुचाकी काढतात. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. अनेकदा शाळकरी मुलेही गेट बंद असताना खालून प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे गेटऐवजी याठिकाणी पूल अथवा भुयारी मार्ग बांधावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)
>भविष्यातील येथील लोकवस्ती वाढणारच आहे. परिणामी वाहतुकीची समस्या आणखी जटील होईल. राष्ट्रीय महामार्गावरून पुणे व कोकणात जाणाऱ्यांना पूल झाल्यास जवळ पडेल. लोकांचा वेळ वाचेल, गेट ओलांडताना अपघात होण्याचा धोका राहणार नाही.
- अॅड. मनोज भुजबळ, अध्यक्ष
बार असोसिएशन, पनवेल
>पोदी नं. १ किंवा विचुंबेहून जुन्या पनवेलमध्ये येताना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. रेल्वे गेटने जायचे तर रेल्वेची वाहतूक वाढल्याने लवकर उघडत नाही. त्यामुळे अनेक जण धोकादायक पध्दतीने गेट ओलांडतात. पूल झाल्यास कोंडीतून सुटका होईल.
- प्रकाश विचारे, अध्यक्ष
अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघ