फटाक्यांसाठी एक खिडकी योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2016 03:31 AM2016-10-17T03:31:40+5:302016-10-17T03:31:40+5:30
स्टॉल आणि दुकानदारांची होणारी परवड लक्षात घेता कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने एक खिडकी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला
कल्याण : दिवाळीत फटाके विक्रीसाठी परवानगी मिळवताना स्टॉल आणि दुकानदारांची होणारी परवड लक्षात घेता कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने एक खिडकी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याणमध्ये ब प्रभाग, तर डोंबिवलीत पालिकेच्या विभागीय कार्यालयात ही योजना
सुरू केली जाणार आहे. विनापरवानगी फटाक्यांची विक्री केल्यास कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला
आहे.
या दुकानांना व स्टॉलधारकांसाठी परवाना देण्याची प्रक्रिया सोयीस्कर व्हावी, या अनुषंगाने अग्निशमन, पोलीस, प्रभाग अधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी झाली. बैठकीला फटाके विक्रेता संघाचे पदाधिकारीही उपस्थित होते.
या वेळी एक खिडकी योजना सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, तात्पुरते फटाका स्टॉल व मंडप उभारण्यासाठी १७ ते २० आॅक्टोबर यादरम्यान ही योजना सुरू करण्यात येणार आहे.
फटाके विक्रेत्यांनी नमूद कालावधीमध्ये अर्ज करून परवानगी प्राप्त करून घ्यावी. या कालावधीनंतर अर्ज करायचे असल्यास त्यात्या विभागाची परवानगी मिळण्यासाठी २१ ते २७ आॅक्टोबर या कालावधीत त्यात्या प्रभाग कार्यालयांत अर्ज करावेत, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले. दिवाळी म्हटली की फटाके स्टॉलधारकांची नेहमीच परवानगीसाठी धावपळ उडतांना दिसते. महापालिकेने घेतलेल्या निर्णयामुळे संबंधितांना काहीसा दिलासा मिळाला असून कारवाईच्या इशाऱ्याने अनधिकृत स्टॉलधारकांचेही धाबे दणाणले आहे. (प्रतिनिधी)
>तीन हजार स्वच्छता शुल्क आकारणार
परवाना घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार इतर नियमित शुल्काव्यतिरिक्त पर्यावरण स्वच्छता शुल्क म्हणून तीन हजार आकारण्यात येणार आहे. हे शुल्क भरल्याशिवाय कोणतेही परवाने अथवा परवानगी दिली जाणार नाही.