शूटिंग परवानग्यांसाठी एक खिडकी योजना- मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 04:09 AM2019-06-21T04:09:47+5:302019-06-21T04:09:59+5:30
१५ ऑगस्टला उद्घाटन, रोजगार मिळण्यास चालना
मुंबई : चित्रपट, मालिका, वेब सीरीज अशा माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. चित्रपटासह विविध चित्रीकरणांसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या परवान्यांसाठी एक खिडकी योजना तयार करण्यात येणार आहे. येत्या १५ आॅगस्ट रोजी या एक खिडकी योजनेच्या डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी विधान परिषदेत दिली.
मीरा रोड येथे वेबसीरीजचे शूटिंग सुरू असताना दिग्दर्शक, कलाकारांना मारहाण झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य किरण पावसकर यांनी या मारहाणीचा मुद्दा उपस्थित केला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, मीरा भाईंदर आणि वसई विरार पट्टयात काही गट झाले आहे. आपल्याच माध्यमातून चित्रीकरण व्हावे, असा त्यांचा हट्ट असतो. त्यांच्यातील वादातून हा हल्ला झाला आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक झाली आहे. आरोपींची आधीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल तर मोक्का लावण्याचा विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या घटनेबाबत ठाणे पोलीस आयुक्त आणि आयजी कोकण हे निर्मात्यांसोबत बैठक घेतील. सर्व परवानग्या घेतल्या असतील तर शूटिंग दरम्यान पोलीस संरक्षण देऊ. या प्रकरणी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी दिरंगाई केल्याची तक्रार आहे. याचीही नोंद घेण्याची सुचना आयुक्तांना दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
सध्या फिल्म इंडस्ट्रीत मोठ्या प्रमाणात निर्मितीचे काम सुरू आहे. या व्यवसायातून छोट्या मोठ्या विविध प्रकारचे रोजगार निर्माण झाले आहेत. त्यामुळे चित्रीकरणासाठी आवश्यक सर्व परवानग्या आॅनलाईन देण्यासाठी या योजनेच्या डीजिटल प्लाटफॉर्मचे उद्घाटन करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
४० विद्यापीठे बोगस
राज्यात ४० विद्यापीठे बोगस असल्याची कबुली उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली. उच्च व तंत्रशिक्षण विभागाला फेब्रुवारीत ही विद्यापीठे बोगस असल्याचे आढळले.