म्हाडाचे सोडत विजेते रडकुंडीला, अडीच वर्षांपूर्वी काढलेल्या लॉटरीतील विजेत्यांना अद्याप फ्लॅटचा ताबा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 06:26 AM2017-09-18T06:26:39+5:302017-09-18T06:26:41+5:30
म्हाडाने अडीच वर्षांपूर्वी काढलेल्या लॉटरीतील विजेत्यांना अद्याप फ्लॅटचा ताबा मिळालेला नाही. महत्त्वाचे म्हणजे विविध मूलभूत सुविधांची पूर्तता न केल्याने इमारतीच्या ताबा प्रमाणपत्रासाठी (ओसी) प्रस्तावही अद्याप महापालिकेकडे पाठविलेला नाही. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे सोडत विजेते रडकुंडीला आले आहेत.
जमीर काझी
मुंबई : म्हाडाने अडीच वर्षांपूर्वी काढलेल्या लॉटरीतील विजेत्यांना अद्याप फ्लॅटचा ताबा मिळालेला नाही. महत्त्वाचे म्हणजे विविध मूलभूत सुविधांची पूर्तता न केल्याने इमारतीच्या ताबा प्रमाणपत्रासाठी (ओसी) प्रस्तावही अद्याप महापालिकेकडे पाठविलेला नाही. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे सोडत विजेते रडकुंडीला आले आहेत.
म्हाडाने ३१ मे २०१५ रोजी लॉटरी काढलेल्या मुलुंड गव्हाणपाडाच्या (सोडत क्रमांक ३१३) विजेत्या ठरलेल्यांची ही अवस्था आहे. म्हाडाच्या धिम्या कारभारामुळे २३ मजली टॉवरमधील घराचा ताबा मिळण्यास आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्याचबरोबर या घरांच्या, नोंदणी व मुद्रांक शुल्कात वाढ झाल्याने काही लाखांचा भुर्दंड सोसावा लागणार आहे.
मुलुंड गव्हाणपाडा येथे म्हाडाकडून मध्यम उत्पन्न व अल्प उत्पन गट (एमआयजी व एलआयजी) बांधण्यात येत असलेल्या गृहसंकुलांची मे २०१५ मध्ये सोडत काढली. या इमारतीच्या मागील जुनी ट्रान्झिट इमारत हटविल्यानंतर पूर्ण तयार झालेल्या ‘एमआयजी’ गटासाठीच्या २३ मजली इमारतीला सहा महिन्यांपूर्वी पालिकेची ओसी मिळाली. मात्र अद्याप सर्व विजेत्यांना घराचा ताबा मिळालेला नाही. तर ‘एलआयजी’धारकांसाठी बांधलेल्या इमारतीच्या मागे अन्य इमारतीचे काम अपूर्ण असल्याने ‘ओसी’साठी प्रस्ताव बनविला नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
अधिकाºयांची सारवासारव
मुंबई मंडळाचे कार्यकारी अधिकारी सुभाष लाखे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘एमआयजी’ गटाची ताबा वाटपाची प्रक्रिया सुरू आहे, ‘एलआयजी’च्या इमारतीला ओसी मिळविण्यासाठी पालिकेकडे प्रस्ताव पाठविल्याचे सुरुवातीला सांगितले. मात्र इतर इमारतीची बरीच कामे व तेथील मूलभूत सुविधा प्रलंबित असल्याने प्रस्ताव कसा जाऊ शकेल, असे सांगितल्यानंतर त्यांनी त्याबाबत सविस्तर माहिती घेतो, अशी सारवासारव करीत दीड महिन्यात ओसी मिळविण्याचा प्रयत्न आहे, असे सांगितले.
घरांच्या ताब्यासाठी
‘पार्ट ओसी’चा पर्याय
पूर्णावस्थेत असलेल्या एका इमारतीची ‘पार्ट ओसी’ मिळविता येऊ शकेल, ती मिळाल्यास ताब्याची प्रक्रिया पूर्ण करता येईल. त्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.