विजेते कामगार बेपत्ता

By admin | Published: July 13, 2015 01:49 AM2015-07-13T01:49:11+5:302015-07-13T01:49:11+5:30

गिरणी कामगारांच्या घराच्या लॉटरीमध्ये विजेते ठरलेल्या ३५६ गिरणी कामगारांचा म्हाडाने आवाहनामार्फत शोध घेतल्यानंतरही अद्यापपर्यंत या कामगारांचा

Winner Worker's Missing | विजेते कामगार बेपत्ता

विजेते कामगार बेपत्ता

Next

तेजस वाघमारे , मुंबई
गिरणी कामगारांच्या घराच्या लॉटरीमध्ये विजेते ठरलेल्या ३५६ गिरणी कामगारांचा म्हाडाने आवाहनामार्फत शोध घेतल्यानंतरही अद्यापपर्यंत या कामगारांचा थांगपत्ता लागलेला नाही. म्हाडाने विजेत्या कामगारांना कागदपत्रे सादर करण्याच्या केलेल्या आवाहनाला किरकोळ प्रतिसाद लाभल्याने म्हाडाने अखेर ही घरे प्रतीक्षा यादीतील कामगारांना देण्याचा
निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव म्हाडाने मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला आहे.
मुंबईतील बंद पडलेल्या गिरण्यांच्या जागेवर गिरणी कामगारांना घरे देण्याचा धोरणात्मक निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार २८ जून २0१२ रोजी म्हाडाने ६ हजार ९२५ गिरणी कामगारांच्या घराची लॉटरी काढली. या सोडतीमध्ये यशस्वी झालेल्या कामगारांकडून म्हाडाने कागदपत्रे मागविली होती. त्यानुसार विजेत्या कामगारांनी कागदपत्रे सादर केल्यानंतर म्हाडामार्फत छाननीची प्रक्रिया पूर्ण करुन सुमारे ५ हजार ५९५ गिरणी कामगारांना घराचा ताबा देण्यात आला आहे.
गिरणी कामगारांच्या लॉटरीत यशस्वी झालेल्या ३९६ गिरणी कामगारांनी गेल्या तीन वर्षांमध्ये म्हाडाकडे पाठपुरावा केलेला नाही. कागदपत्रे सादर न केलेल्या विजेत्या कामगारांना कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन म्हाडाने केले होते. त्यासाठी १५ जूनपर्यंत अखेरची मुदत देण्यात आली होती. या मुदतीमध्ये केवळ ४0 विजेत्या कामगारांनी म्हाडाकडे कागदपत्रे सादर केली. उर्वरित ३५६ विजेत्या कामगारांनी अद्यापपर्यंत कागदपत्रे म्हाडाकडे सादर केलेली नाहीत. त्यामुळे म्हाडाने लॉटरीमधील प्रतिक्षा यादीतील कामगारांना घरे देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव म्हाडाने शासनाकडे पाठविला असल्याचे, म्हाडाच्या मिळकत व्यवस्थापन विभागाचे उपमुख्य अधिकारी विशाल देशमुख यांनी सांगितले.
या प्रस्तावाला शासनाकडून मंजुरी मिळाल्यास प्रतीक्षा यादीतील ३५६ गिरणी कामगारांचे घराचे स्वप्न पूर्ण पूर्ण होणार आहे.

Web Title: Winner Worker's Missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.