‘म्हाडा’ सोडत विजेत्यांची परवड
By admin | Published: December 26, 2016 04:39 AM2016-12-26T04:39:52+5:302016-12-26T04:39:52+5:30
मुंबईकरांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी वर्षाला हजारो घरांची निर्मिती करण्याची घोषणा करणाऱ्या म्हाडाची प्रत्यक्षात कृती मात्र
जमीर काझी /मुंबई
मुंबईकरांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी वर्षाला हजारो घरांची निर्मिती करण्याची घोषणा करणाऱ्या म्हाडाची प्रत्यक्षात कृती मात्र, ‘पुढचे पाठ मागचे सपाट’ अशी असल्याची स्थिती आहे. दीड वर्षापूर्वी सोडत काढण्यात आलेली मुलुंड गव्हाणपाडा येथील बांधकाम अद्याप अपूर्णावस्थेत आहेत. त्यामुळे एका वर्षात या घराच्या किमती सरासरी पाच लाखांनी
वाढल्या आहेत. कामाची ही ‘कूर्मगती’ कायम राहिल्यास, त्यामध्ये आणखी वाढ होण्याच्या शक्यतेने घर विजेत्यांची अवस्था ‘भीक नको, पण कुत्रा आवर’ अशी झाली आहे.
नव्या इमारतींच्या परिसरातील दुरवस्थेतील संक्रमण इमारत (ट्रान्झिस्ट) पाडण्यात प्रशासनाने दिरंगाई केल्याने, प्रदूषण महामंडळाकडून ना हरकत दाखला (एनओसी) मिळण्यास विलंब लागत आहे. प्रशासनाच्या या दिरंगाईकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुलर्क्ष झाल्याने, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष देऊन संबंधितावर कार्यवाही करावी, अशी मागणी सोडत विजेत्यांकडून व्यक्त होत आहे.
मुलुंड गव्हाणपाडा येथे म्हाडाकडून मध्यम उत्पन्न व अल्प उत्पन गट (एमआयजी व एलआयजी) बांधण्यात येत असलेल्या गृहसंकुलांची मे २०१५ मध्ये सोडत काढण्यात आली आहे. त्या वेळी या इमारतीचे बांधकाम काम सरासरी ६० ते ७५ टक्के झाले होते. आता दीड वर्षे पूर्ण होत आली असताना, ‘एमआयजी’ धारकासाठीची इमारतीचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे, तर ‘एलआयजी’साठीची २३ मजली बिल्डिंगमधील अंतर्गत कामे रखडलेली आहेत. त्याशिवाय या इमारतीच्या मागे उभारण्यात येत असलेली बिल्डिंग अद्याप अर्धवट अवस्थेत आहे. याच भागात मोडकळीस आलेली तीन मजली ट्रान्झिस्ट इमारत आहे. ती हटविल्यानंतर प्रदूषण मंडळाकडून नाहरकत दाखला मिळेल. त्यानंतर, मुंबई महापालिकेकडे ताबा प्रमाणपत्रासाठी (ओसी) प्रयत्न करता येणार आहे. मात्र, म्हाडाच्या सुस्ताईमुळे त्याला आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. या दरम्यानच्या काळात या गृहसंकल्पातील काही सदनिका या वर्षाच्या सोडतीत घेण्यात आली. त्याची किंमत गेल्या वर्षाच्या तुलनेत सरासरी पाच लाखांनी वाढविली आहे. त्यामुळे म्हाडाच्या नियमानुसार, २०१५च्या सोडतीतील विजेत्यांनाही याच किमतीने घर विकत घ्यावे लागणार आहे.
मार्केटिंग विभागाकडे निकालाची प्रत नाही
विजेत्याचा खरेदी व्यवहार पणन मंडळाकडून होत असल्याने, त्यांच्याकडे सोडतीचा पूर्ण निकाल असणे अत्यावश्यक आहे. मात्र, या ठिकाणीही ढिसाळ कारभाराचा अनुभव येत आहे. या वर्षीच्या लॉटरीचा निकाल जाहीर झाल्याने, म्हाडाने २०१५च्या सोडतीचा निकाल संकेतस्थळावरून काढला. त्यामुळे विजेत्यांच्या यादीची प्रत पणन विभागाचे उपमुुख्याधिकारी तुषार मठकर यांच्याकडे मागितली असता, त्यांनी आपल्याकडे उपलब्ध नसल्याची कबुली देत, संगणक विभागाकडून मागविण्यात आल्याचे सांगितले.
मात्र, तब्बल दोन महिने पाठपुरावा करूनही, त्यांनी केवळ त्याबाबत आश्वासनावर बोळवण केली आहे. पणन मंडळाकडे निकाल उपलब्ध नसल्याने, दलालाकडून बनावट कागदपत्राच्या आधारे परस्पर घरे दुसऱ्याला विकून लाखोंचा गैरव्यवहार होण्याचा धोका आहे.बांधकामाच्या विलंबाबाबत म्हाडा मुंबई मंडळाचे कार्यकारी अधिकारी सुभाष लाखे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही, तर कुर्ला-मुलुंड विभागाचे कार्यकारी अभियंता आनंद तोंशाळ यांनी इमारतीचे काम पूर्ण केले जाईल, ट्रान्झिस्ट इमारत हटविण्याचे काम सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले.