रितेशच्या ‘लय भारी’ संवादाने जिंकले
By admin | Published: July 9, 2014 01:04 AM2014-07-09T01:04:12+5:302014-07-09T01:04:12+5:30
मी हिंदी चित्रपटातून समोर आलो हे सर्वांनाच माहिती आहे. मी मराठी कुटुंबातला मुलगा आहे. त्यामुळे हिंदीत काही चित्रपट केले तरी मला मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा होतीच.
लोकमत सखी मंच : युवा नेक्स्टच्या सदस्यांशी अभिनेता रितेश देशमुखचा मनमोकळा संवाद
नागपूर : मी हिंदी चित्रपटातून समोर आलो हे सर्वांनाच माहिती आहे. मी मराठी कुटुंबातला मुलगा आहे. त्यामुळे हिंदीत काही चित्रपट केले तरी मला मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा होतीच. पण मला हव्या असलेल्या एखाद्या वेगळ्या आणि अनोख्या भूमिकेसाठी मी थांबलो होतो. ‘लय भारी’ चित्रपटात मला जशी हवी होती तशीच जरा आव्हानात्मक आणि वेगळी भूमिका मिळाली. त्यामुळे योग्य वेळी मी मराठी चित्रपटात आलो आहे. विशेष म्हणजे ही भूमिका मला माझ्या मराठी भाषेत करता आली, याचे समाधान खूप मोठे आहे. यावेळी त्याच्या ‘लय भारी’ संवादाने उपस्थितांना जिंकले.
लोकमत सखी मंच आणि युवा नेक्स्टच्या निवडक सदस्यांशी त्याचा हा संवाद लोकमत भवनातील दर्डा कलाविथिकेत आयोजित करण्यात आला.
याप्रसंगी रितेशनेही सर्व प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली. याप्रसंगी रितेश देशमुखसह ‘लय भारी’ चित्रपटातील कलावंत शरद केळकर, आदिती पोहनकर, निर्माते अमेय खोपकर, झी मराठीचे निखिल साने प्रामुख्याने उपस्थित होते. हिंदीत विनोदी आणि शांतप्रकारच्या भूमिका केल्यानंतर ‘लय भारी’ यात वेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या. यात मराठी आणि हिंदीत काय फरक जाणवतो? असे विचारले असता त्याने प्रत्येकच भूमिका कलावंतासाठी आव्हान असते. आतापर्यंत प्रत्येकच भूमिका मला महत्त्वाची वाटली, कारण मला त्या भूमिकेला न्याय द्यायचा होता. चित्रपटात भूमिकेप्रमाणे आपण वाटायला हवे म्हणून प्रयत्न करावे लागतात. ‘लय भारी’ हा अतिशय वेगळा आणि तांत्रिकदृष्ट्या समृद्ध चित्रपट मराठीत जवळपास १५ वर्षांनंतर येतो आहे. हा चित्रपट आणि यातील भूमिका ‘लार्जर दॅन लाईफ’आहे. हा मराठीतला एक वेगळा प्रयोग प्रेक्षकांना नक्की आवडेल, असा विश्वास वाटतो. याशिवाय मराठीत या भूमिकेत लोक मला स्वीकारतात की नाही, हे आता कळेलच. यावेळी आदिती म्हणाली, यापूर्वी मालिका आणि जाहिरातीत काम केले आहे, पण चित्रपटात प्रथमच काम केले. रितेशसह मला बरेच शिकता आले. शरद केळकरने यावेळी आपल्या भारदस्त आवाजाने जिंकले. उपस्थितांच्या आग्रहास्तव रितेशने गीत सादर केले.
लोकमत नागपूरचे महाव्यवस्थापक नीलेश सिंग यांनी कलावंतांचे स्वागत तर नेहा जोशी यांनी संचालन केले. (प्रतिनिधी)