परदेशी पाहुण्यांचे ‘हिवाळी संमेलन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2016 04:47 AM2016-11-08T04:47:34+5:302016-11-08T04:47:34+5:30

राष्ट्रीय पक्षी अभयारण्याचा दर्जा प्राप्त असलेल्या निफाड तालुक्यामधील नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यातील जलाशयावर देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांच्या हिवाळी संमेलनाला सुरुवात झाली आहे.

'Winter Conference' for Foreign Guests | परदेशी पाहुण्यांचे ‘हिवाळी संमेलन’

परदेशी पाहुण्यांचे ‘हिवाळी संमेलन’

googlenewsNext

अझहर शेख, नाशिक
राष्ट्रीय पक्षी अभयारण्याचा दर्जा प्राप्त असलेल्या निफाड तालुक्यामधील नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यातील जलाशयावर देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांच्या हिवाळी संमेलनाला सुरुवात झाली आहे.
विजयादशमीचा सण साजरा होताच विविध प्रजातीच्या पक्ष्यांनी सीमोल्लंघन करत नांदूरमधमेश्वरचे जलाशय गाठण्यास सुरुवात केली असून, सध्या येथे देशी-विदेशी पक्ष्यांचा मेळा भरला आहे. स्थानिक स्थलांतरित पक्षी जणू यजमानाच्या भूमिकेत असून, पाहुण्यांचे स्वागत करत असल्याचे किलबिलाटावरून लक्षात येते. नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक थंडीचा तालुका म्हणून निफाडची ओळख आहे.
जिल्ह्यासह निफाडमध्ये जोरदार पाऊस झाल्याने थंडीचे दमदार आगमन झाले आहे. निफाडच्या हद्दीत पोहचताच सकाळी बोचऱ्या थंडीचा अनुभव येतो. सद्यस्थितीत सुमारे २० प्रकारचे पक्षी नांदूरमधमेश्वर अभयारण्यात विहार करताना दिसून येत आहेत. नांदूरमधमेश्वर अभयारण्याकडे पक्षी येण्याचे प्रमाण वाढू लागल्याने परिसर पक्ष्यांच्या आवाजाने गजबजू लागला आहे. त्यामुळे पक्षीप्रेमींनाही मोह
आवरता येत नसून ‘वीकेण्ड प्लॅन’साठी येथील पक्षी अभयारण्याला हौशी व अभ्यासू पक्षीप्रेमींकडून भेट दिली जात आहे.
आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून पक्ष्यांची संख्या अभयारण्यामध्ये वाढू लागल्याचे येथील युवा पक्षी निरीक्षक अमोल दराडे, शंकर लोखंडे यांनी सांगितले.

गेल्या वर्षी नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यामध्ये सोईसुविधांची मोठ्या प्रमाणात वानवा होती. मात्र, नाशिक वनविभागाने (वन्यजीव) यंदा विविध विकासकामे पूर्ण केली आहेत. चापडगावला पक्षी अभयारण्यालगत वनविभागाने उद्यान उभारले असून, येथे इको हट, इको कॅन्टिन, प्रसाधनगृहे, तंबू निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
पक्षीनिरीक्षण मनोऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. पक्षीनिरीक्षण गॅलरीचा मजलाही वाढविण्यात आला असून, मजबुतीकरण करण्यात आले आहे. पर्यटकांसाठी सुसज्ज वाहनतळ व प्रतीक्षागृहही उपलब्ध झाले आहे.

Web Title: 'Winter Conference' for Foreign Guests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.