विधान परिषदेत दानवेंचे आरोप अन् मंत्री लोढांचा राजीनामा; गोऱ्हेंनी केली मध्यस्थी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 12:53 PM2023-12-20T12:53:13+5:302023-12-20T12:54:27+5:30
माझ्या खात्यात एक रुपयाचाही भ्रष्टाचार होत नाही. विनापुरावे आरोप थांबले पाहिजेत अशी तीव्र भावना मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केली.
नागपूर - Nagpur Winter Session ( Marathi News ) मी १० वर्षापासून माझ्या कौटुंबिक व्यवसायात नाही. माझ्या कुटुंबाचा व्यवसाय केवळ मुंबईतच नाही. माझा मुलगा जगभरात त्याचा व्यवसाय करतोय. कुणी कायदेशीर काम करून उद्योग करत पैसा कमावणे चांगले आहे की काही काम न करता घरी आरामात राहायचे ते चांगले आहे? एकही बेकायदेशीर काम माझ्या कुटुंबाकडून सुरू असेल तर मी माझा राजीनामा सादर करतो असं थेटपणे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत म्हटलं आहे.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर आरोप केले. त्यानंतर लोढा यांनी संतप्त प्रतिक्रिया देत सभागृहातच कोऱ्या कागदावर राजीनामा सादर केला. या संपूर्ण घटनेने सभागृहात गोंधळ उडाला. मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, माझ्या कुटुंबाचा व्यवसाय असला हा गुन्हा आहे का? मी ३० वर्षापासून या सदनाचा सदस्य आहे. मी कधीही माझ्या पदाचा दुरुपयोग केला नाही. कुटुंबात कुणी उद्योग करायचा नाही का? जर कुणी केला आणि त्यात यशस्वी झाले म्हणून आक्षेप घ्यायचे सुरू आहे. मी अंबादास दानवेंचा व्यक्तिगत सन्मान करतो. पण आज त्यांनी सभागृहात माझ्यावर जे आरोप केले ते सिद्ध करावेत अन्यथा माझा राजीनामा घ्यावा. कुणावरही विनापुरावे आरोप करू नये अशी मी विनंती करतो असं लोढा यांनी सभागृहात सांगितले.
त्यावर मी लोढा यांचे नाव परत घेतले आहे. पण मी केलेल्या आरोपांचे पुरावे द्यायचे असतील तर तीदेखील माझी तयारी आहे असं अंबादास दानवेंनी उत्तर दिले.तेव्हा पुरावे असतील तर मांडा. हे काय चाललंय, कुटुंबाचा व्यवसाय आहे, मुलगा उद्योग करतो. माझ्यावर आरोप कशाला करता, आम्हीदेखील सार्वजनिक जीवनात आहोत. पुरावे द्या. तुमच्या सोयीनुसार तारीख सांगा. मी स्वत: पुरावे घ्यायला येतो. मी पारदर्शीपणे काम करतो. माझ्या खात्यात एक रुपयाचाही भ्रष्टाचार होत नाही. विनापुरावे आरोप थांबले पाहिजेत अशी तीव्र भावना मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केली.
उपसभापती नीलम गोऱ्हेंनी केली मध्यस्थी
विधान परिषदेत लोढा संतापलेले पाहून उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मध्यस्थी केली. त्या म्हणाल्या की, सभागृहाच्या कामकाजातून लोढा यांचे नाव काढले. अनेकजण राजीनामे खिशात घेऊन फिरतात. परंतु लोढा यांनी खिशातून राजीनामा काढला. माझ्याकडे द्यायची तयारी दाखवली. तुमच्या भावना प्रामाणिक असतील. त्यामुळे अंबादास दानवे यांच्याकडे पुरावे असतील तर तपास यंत्रणांना द्यावे. आरोपांची शहानिशा त्या यंत्रणा करतील असं उपसभापतींनी सांगितले. तर माझ्याकडे त्यांच्या विभागाच्या काही तक्रारी आल्या त्या मी इथं मांडल्या हा गुन्हा आहे का? असा सवाल अंबादास दानवेंनी विचारला. त्याचसोबत आमचे व्यक्तिगत संबंध चांगले आहे. माझ्याकडे आलेल्या तक्रारी विरोधी पक्षनेते म्हणून मी मांडल्या असंही दानवे यांनी म्हटलं.
अंबादास दानवेंनी केला आरोप
हे सरकार सर्वसामान्यांचे नाही. मंत्रिमंडळातील मंत्री बघितले तर एकएकाचे प्रताप समोर येतात. मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे बोलायचे झाले तर मुंबईत काय सुरू आहे, ठाणे, कल्याण, भिवंडी परिसरात अनेक जमिनी घ्यायच्या. एक भाजपा नेते आणि मुंबईचे पालकमंत्री यांच्याशी संबंधित अनेक अवैध ठिकाणी बांधकाम आणि घरांची विक्री सुरू आहे. भाजपा उघड्या डोळ्याने हे सर्व बघतंय असं दानवेंनी सभागृहात म्हटलं.