कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 06:52 PM2020-11-10T18:52:00+5:302020-11-10T18:52:30+5:30
७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार
मुंबई: राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन ७ डिसेंबर २०२० पासून नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीमध्ये घेण्यात आला. मुंबईत विधानभवनात दोन्ही सभागृहाच्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली.
बैठकीला विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे) संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभा आणि विधानपरिषद सदस्य, विधान मंडळाचे सचिव राजेंद्र भागवत, संबंधित अधिकारी उपस्थित होते.
हिवाळी अधिवेशन नागपूर येथे आयोजित करण्यात येते, पण सध्या जगावर, देशात आणि राज्यावर असलेले कोरोनाचे संकट आणि राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता नागपूरऐवजी हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच दि.७ डिसेंबर 2020 ला अधिवेशन घेता येईल का आणि किती दिवस घ्यायचे याबाबतही या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा कामकाज सल्लागार समितीची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.
बैठकीत हिवाळी अधिवेशनासाठी लागणाऱ्या सुविधांचाही आढावा घेण्यात आला. अनेक विधिमंडळ सदस्यांनी नागपूर येथे कोविडच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन घेणे उचित होणार नाही अशा सूचना यावेळी केल्या.