हिवाळी अधिवेशनाला सुरुवात; पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक, सरकारविरोधात घोषणाबाजी
By मुकेश चव्हाण | Published: December 7, 2023 11:13 AM2023-12-07T11:13:15+5:302023-12-07T11:35:42+5:30
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरु झाले आहे. २० डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
विधानभवन परिसरात विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन विरोधक सरकारविरोधात घोषणाबाजी देत आहे. बळीराजा अवकाळीने त्रस्त, सरकार मात्र जाहिरातीत व्यस्त, सरकार सांगते दुष्काळ सदृश्य, कारण सरकार आहे अदृश्य, अशा घोषणा देण्यात आल्या. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे अशी विरोधकांकडून मागणी करण्यात येत आहे. यावेळी अनेक आमदरांनी गळ्यात गळलेल्या संत्र्यांचा हार घातल्याचे पाहायला मिळाले.
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कापूस सोयाबीनला भाव नाही. शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. अश्या स्थितीत द्या. सरकार केवळ पंचनामे करत आहे. आम्हाला घोषणा नकोत तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला पाहिजे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
नागपूर- विधानभवन परिसरात विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन विरोधक सरकारविरोधात घोषणाबाजी दिल्या. #MaharashtraPoliticspic.twitter.com/YzAI6UsT53
— Lokmat (@lokmat) December 7, 2023
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्याच्या इतिहासातील विक्रमी पुरवणी मागण्या मांडण्याची तयारी महायुती सरकारने केली आहे. मंगळवारी संध्याकाळी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या पुरवणी मागण्यांना मंजुरी देण्यात आली. बुधवारी विधानसभा आणि विधानपरिषदेत तब्बल ५३ ते ५५ हजार कोटी रुपयांच्या घरात पुरवणी मागण्या सादर केल्या जाणार आहेत.
विक्रम मोडणार?
महायुती सरकारनेच मागील वर्षीच्या (डिसेंबर २०२२) हिवाळी अधिवेशनात राज्याच्या इतिहासातील ५२ हजार ३२७ कोटी ८३ लाख रुपयांच्या सर्वाधिक पुरवणी मागण्या मंजूर केल्या होत्या. महायुती सरकारच्या मागील अधिवेशनात म्हणजेच जुलै २०२३ मधील पावसाळी अधिवेशनातही ४१ हजार २४३ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या होत्या.
अवकाळीसाठी तरतूद
अवकाळी पावसामुळे राज्यात सव्वापाच लाख हेक्टर शेतीक्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यातील सव्वादोन लाख हेक्टर क्षेत्रातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. या नुकसानीच्या भरपाईसाठीची तरतूदही या पुरवणी मागण्यांत करण्यात आल्याचे समजते.