हिवाळी अधिवेशन केवळ दहा दिवसांचे, ११ डिसेंबरला प्रारंभ : १३ विधेयके, ११ अध्यादेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 04:19 AM2017-11-29T04:19:50+5:302017-11-29T04:20:26+5:30
मुंबई : नागपूर येथे भरणारे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ११ डिसेंबरपासून सुरू होणार असून २२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. रविवारची सुटी वगळता केवळ दहा दिवस कामकाज होणार असून या कालावधीत १३ विधेयके, ११ अध्यादेश आणि विधान परिषदेतील प्रलंबित विधेयके मान्यतेसाठी सभागृहात मांडण्यात येणार आहेत. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी ही माहिती दिली.
हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने मंगळवारी विधान भवनात कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. विधासभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गटनेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना बापट म्हणाले, ११ ते २२ डिसेंबरदरम्यान हिवाळी अधिवेशन असेल आणि २१ तारखेला अंतिम आठवडा प्रस्ताव मांडणार येणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी केली होती, त्याकडे लक्ष वेधले असता याबाबत निर्णय घेण्यासाठी २० डिसेंबर रोजी पुन्हा एकदा कामकाज सल्लागार समितीची बैठक घेतली जाईल, असे बापट यांनी सांगितले.
सरकार चर्चेला तयार
विरोधात असताना भाजपाने किमान महिनाभर हिवाळी अधिवेशन चालविण्याची भूमिका घेतली होती. याबाबत विचारले असता बापट म्हणाले की, आम्ही विरोधात असताना जनतेच्या प्रश्नांसाठी सभागृहात चर्चा करत होतो, प्रश्न उपस्थित करत होतो. त्यामुळे कामकाज संपायचे नाही. त्यामुळे महिनाभर अधिवेशन चालविण्याची मागणी आम्ही त्या वेळी करत होतो. दुर्दैवाने आता तसे होत नाही. चर्चेपेक्षा गोंधळ करून कामकाज बंद पाडायचे काम विरोधक करत असल्याची टीका मंत्री बापट यांनी केली. सरकार सर्व प्रकारच्या चर्चेला तयार असल्याचेही ते म्हणाले.