नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले; अंबादास दानवेंची टीका, फडणवीसांचंही प्रत्युत्तर
By मुकेश चव्हाण | Published: December 7, 2023 01:25 PM2023-12-07T13:25:38+5:302023-12-07T14:04:47+5:30
Winter Session Maharashtra: गेल्या अनेक दिवसांपासून नवाब मलिकांनी अजित पवार गटाला पाठिंबा देणार की शरद पवार गटाला याबाबत अधिकृत भूमिका जाहीर केली नव्हती.
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरु झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी देखील अधिवेशनासाठी आज सभागृहात हजेरी लावली.
गेल्या अनेक दिवसांपासून नवाब मलिकांनी अजित पवार गटाला पाठिंबा देणार की शरद पवार गटाला याबाबत अधिकृत भूमिका जाहीर केली नव्हती. मात्र आज विधानभवन परिसरात दाखल होताच नवाब मलिक यांनी अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांच्या कार्यालयात हजेरी लावली. मग सभागृहात गेल्यानंतर नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाकावर शेवटच्या रांगेत बसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे नवाब मलिक यांनी अधिकृत भूमिका जाहीर केली नसली तरी त्यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचं स्पष्ट झालं आहे.
नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसल्याने विधानपरिषदेत विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी सवाल उपस्थित केला. अंबादास दानवे म्हणाले की, आज खालच्या सभागृहात (विधानपरिषदेत) एक सदस्य बसले. या सदस्याविषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सातत्याने आम्ही अशा सदस्याच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही, अशी भूमिका घेत होते. या सदस्यावर काह गुन्हे होते, हे सर्वांना माहिती आहे. आज हेच सदस्या सभागृहात सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले. ज्याच्याविषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देशद्रोहाचे गुन्हे आहेत, असं बोलत होते. त्यामुळे आता सरकारची काय भूमिका आहे?, असा सवाल अंबादास दानवे यांनी सभागृहात उपस्थित केला.
अंबादास दानवेंच्या या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. मला एका गोष्टीच आश्चर्य वाटतं की, ज्यांच्या नेत्यांनी भूमिका घेतली की प्रत्यक्ष व्यक्ती तुरुंगात असताना देखील मंत्रिपदावरुन काढणार नाही, ते आता इकडे भूमिका मांडत आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच आम्ही कोणाच्या मांडीला मांडी लावून बसलेलो नाही. मी आणि मुख्यमंत्री एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलो आहे. आमच्या बाजून अजितदादा मांडीला मांडी लावून बसलेत व त्यांच्या बाजूला छगन भुजबळ बसलेत. त्यामुळे तुम्ही काळजी करु नका, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं. देशद्रोहाचा आरोप झाल्यानंतर सदर सदस्याला मंत्रिपदावरुन का काढले नाही?, त्यांचा राजीनामा का घेतला नाही?, याचं उत्तर आधी द्या, असं प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला.
ज्यांनी कारागृहात असताना मंत्रिपदावरून काढले नाही, त्यांनी आधी उत्तर द्यावे आणि मग आम्हाला प्रश्न विचारावे!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 7, 2023
(विधानपरिषद । गुरुवार, दि. 7 डिसेंबर 2023)#Maharashtra#WinterSession2023#Winter#WinterSession#Nagpur#Adhiveshan#WinterAssemblySession2023#हिवाळीअधिवेशन… pic.twitter.com/iIHeqdULtB
राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर बहुतांश आमदार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटात सामील झाले आहेत. मात्र सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आलेल्या जामिनानंतर तुरुंगातून बाहेर आलेले नवाब मलिक नक्की कोणत्या गटात जाणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. ईडीकडून करण्यात आलेल्या अटकेनंतर गेल्या अनेक महिन्यांपासून सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर गेलेले मलिक हे सध्या जामिनावर बाहेर असून अनेक दिवसांनी नवाब मलिक आज सभागृहात दिसले.
नागपूर- नवाब मलिक हिवाळी अधिवेशनासाठी विधानभवनात दाखल झाले आहेत. @nawabmalikncp#NawabMalik#MaharashtraPoliticspic.twitter.com/LF2cxuXbMi
— Lokmat (@lokmat) December 7, 2023