खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी महाराष्ट्रात आता 'मिशन लक्ष्यवेध'; क्रीडामंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 08:18 PM2023-12-20T20:18:15+5:302023-12-20T20:18:31+5:30

कसं असेल 'मिशन लक्ष्यवेध'? मिळाला किती कोटींचा निधी? वाचा सविस्तर

Winter Session Maharashtra Sports Minister Sanjay Bansode informs Mission Lakshyavedh in state to raise the performance of players | खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी महाराष्ट्रात आता 'मिशन लक्ष्यवेध'; क्रीडामंत्र्यांची घोषणा

खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी महाराष्ट्रात आता 'मिशन लक्ष्यवेध'; क्रीडामंत्र्यांची घोषणा

Sports in Maharashtra: राज्यातील खेळाडूंची कामगिरी सातत्याने उंचाविण्यासाठी योजनाबद्ध कृती कार्यक्रम क्रीडा विभागाने हाती घेतला आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा व खेलो इंडिया, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत खेळाडूंना केंद्र बिंदू मानून खेळाडू व स्पर्धा केंद्रीत 'मिशन लक्ष्यवेध' आराखडा तयार करण्यात आला आहे. मंत्रिमंडळाने क्रीडा विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून 'मिशन लक्ष्यवेध' ही महत्त्वकांक्षी योजना राबविण्यात येणार आहे, असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

क्रीडा क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थेशी करार करण्यात येणार असून या योजनेच्या सनियंत्रणासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे रुपांतर महाराष्ट्र क्रीडा प्राधिकरण (Sports Authority of Maharashtra) करण्यात येणार आहे, असे क्रीडा मंत्री संजय बनसोडे म्हणाले.

कसे असेल 'मिशन लक्ष्यवेध' ?

  • प्रथम टप्यात १२ खेळ निश्चित केले असून यामध्ये अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, हॉकी, कुस्ती, आर्चरी, शुटींग, रोईंग, सेलिंग, लॉन टेनिस व टेबल टेनिस या खेळांचा समावेश आहे.
  • या खेळांची हाय परफॉर्मन्स सेंटर राज्यात विविध ठिकाणी सुरु करण्यात येणार आहे. तसेच विभागीय स्तरावर ३७ स्पोर्टस एक्सलन्स सेंटर व जिल्हास्तरावर १३८ क्रीडा प्रतिभा विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहेत.
  • जिल्हा विकास आराखडा तयार करुन १० टक्के निधी क्रीडा विकास आराखड्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.
  • पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात अत्याधुनिक सुसज्य असे स्पोर्टस सायन्स सेंटर स्थापन करण्यात येणार आहे. तसेच विभागीय व जिल्हास्तरावर खेळाडूंसाठी समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. त्याद्वारे खेळाडूंना करिअरच्या संधीची माहिती दिली जाणार आहे.


मिशन लक्ष्यवेधसाठी १६० कोटींचा निधी

निवडलेल्या १२ खेळ प्रकाराच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. १६० कोटी इतका निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. तसेच प्रशिक्षण केंद्र व इतर सुविधांकरिता जिल्हा स्तरावर अंदाजे ५५ कोटी, विभागीय स्तरावर ५५ कोटी आणि राज्य स्तरावर ५० कोटी खर्च अपेक्षित आहे.

३७४० खेळाडूंच्या अद्यावत क्रीडा प्रशिक्षणाची व्यवस्था

  • जिल्हास्तरावर १३८ क्रीडा प्रतिभा विकास केंद्रांची स्थापना करण्यात येईल. त्याचबरोबर विभागीय मुख्यालयाचे ठिकाणी उपरोक्त निकषानुसार एकूण ३७ स्पोर्टस एक्सलन्स सेंटरची स्थापना करण्यात येईल. त्याचप्रमाणे राज्यस्तरावर १२ हाय परफॉर्मन्स सेंटरची स्थापना करण्यात येईल.
  • या माध्यमातून जिल्हास्तरावर २७६०, विभागीय स्तरावर ७४० आणि राज्यस्तरावर २४० अशा एकूण ३७४० खेळाडूंच्या अद्यावत क्रीडा प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाणार आहे, असे ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी कळविले आहे. 

Web Title: Winter Session Maharashtra Sports Minister Sanjay Bansode informs Mission Lakshyavedh in state to raise the performance of players

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.