राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख अखेर ठरली, ७ डिसेंबरपासून सुरु होणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 01:07 PM2023-11-29T13:07:26+5:302023-11-29T13:08:24+5:30
मुंबईत झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत तारखेबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई - राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होणार की ११ डिसेंबरपासून याबाबतचा गोंधळ होता. मात्र, अखेर आज हिवाळी अधिवेशनाची तारीख निश्चित झाली आहे. मुंबईत झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत तारखेबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनास येत्या ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणार आहे.
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्याची मागणी विरोधकांकडून वारंवार होत होती. त्यानुसार आता राज्याच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला ७ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. २० डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. तसेच, १९ डिसेंबर रोजी पुन्हा कामकाज सल्लागार समितीची अधिवेशनात बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, विधिमंडळाच्या मुंबईत झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी नागपूरचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होईल, अशी घोषणा झाली होती. मात्र, गेल्या आठवड्यात अशी चर्चा सुरू झाली, की अधिवेशन ११ डिसेंबरपासून सुरू होईल. ११ डिसेंबरपासून अधिवेशन घेतले तर पहिला दिवस शोकप्रस्तावात जाईल. दुसऱ्या दिवशी आरक्षण आदी विषयांवर गोंधळ होण्याची शक्यता आहे. म्हणजे प्रत्यक्ष अधिवेशन १३ डिसेंबरपासून सुरू होईल आणि २० डिसेंबरला अधिवेशन संपविले तर केवळ आठ दिवसांचे अधिवेशन होईल. त्यामुळे याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.
सरकार अधिवेशनाबाबत गंभीर नाही- विजय वडेट्टीवार
किमान तीन आठवडे हे अधिवेशन चालावे, अशी आमची अपेक्षा होती. मात्र सरकार राज्यातील प्रश्नांबाबत गंभीर दिसत नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ३ आठवड्याच्या अधिवेशनाची मागणी होती. मात्र, सरकारने ३ आठवड्याऐवजी २ आठवड्याचे अधिवेशन ठेवले. अधिवेशनाबाबत सरकार गंभीर नाही, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
अधिवेशनात जोरदार गदारोळ होण्याची शक्यता
मराठा आरक्षणावरुन सुरू असलेला संघर्ष, पुण्यातील ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण, कंत्राटी भरती, राज्यातील दुष्काळजन्य स्थिती, पाण्याचा प्रश्न, कायदा-सुव्यवस्था, अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान या मुद्द्यांवरून अधिवेशनात जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिवेशनाची वेळ वाढविण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे.