पश्चिम वर्हाडात अवकाळी पाऊस !
By admin | Published: January 2, 2015 12:29 AM2015-01-02T00:29:47+5:302015-01-02T00:29:47+5:30
गारपीटीने खरीप, रब्बीपिकासह फळे, भाजीपाला पिकाचे नुकसान.
अकोला : अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले. तीनही जिल्ह्य़ात बुधवारी झालेल्या गारपीटीमुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. शहरासह ग्रामीण भागातील वीज पुरवठाही खंडित झाला होता.
बुधवारी रात्री व आज सकाळी अवकाळी पावसाने अकोला जिल्हयाला झोडपले. पावसामुळे खरीप, रब्बीसह भाजीपाला, फळ पिकांचे नुकसान झाले आहे. वारा आणि पावसामुळे जिल्हयासह शहरातील विजपुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. आज दिवसभर पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. आज सकाळी ८.३0 वाजतापर्यंत जिल्ह्यात ३७.५ मि.मी. पावसाची नोंद झाली होती.
*बुलडाणा हरवले धुक्यात
बुलडाणा जिल्ह्यात संग्रामपूर, नांदूरासह बुलडाणा तालुक्यातील चांडोळ, इरला परिसरात गारपीट झाल्याने शेतकर्यांचे मोठ्य़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. १ जानेवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात ४३.७ मिमी पावसाची नोंद झाली असुन दुपारी ४ वाजता बुलडाणा शहर धुक्यामध्ये हरवून गेले होते. संग्रामपूर तालुक्यातील वकाणा, रूधाना, काकोडा, बोडखा, पळशी, संग्रामपूर शिवारातील कांदा पिक उदध्वस्त झाल्यात जमा आहेत. शेगाव खामगाव परीसरात आज सकाळी जोरदार पाऊस झाल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे बुलडाणा परिसरातील २८ हजार हेक्टर क्षेत्र पिकाला नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
*वाशिम जिल्ह्यात फळबागांना फटका
बुधवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाने वाशिम जिल्ह्यात फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हयात सरासरी ७.१७ पावसाची नोंद आहे. मालेगाव तालुक्यातील मेडशी या भागात बोराएवढी गारा पडल्या आहेत. मेडशी , कारंजा व मंगरूळपीर व मानोरा परिसरातही गारपीट झाली. १ जानेवारी रोजी जिल्हयात ७.१७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.