डिसेंबरपर्यंत सात रेल्वे स्थानकांत वायफाय
By admin | Published: October 25, 2016 04:31 AM2016-10-25T04:31:44+5:302016-10-25T04:31:44+5:30
स्मार्ट फोनवर जलद आणि मोफत इंटरनेट सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी मध्य व पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय स्थानकांत वायफाय सुविधा सुरू करण्यात आली.
मुंबई : स्मार्ट फोनवर जलद आणि मोफत इंटरनेट सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी मध्य व पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय स्थानकांत वायफाय सुविधा सुरू करण्यात आली. ११ स्थानकांत वायफाय उपलब्ध करण्यात आल्यानंतर आता आणखी ७ रेल्वे स्थानकांत येत्या डिसेंबरपर्यंत सुविधा देण्यात येईल.
गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. यासाठी रेलटेल आणि गुगलमार्फत वायफाय सुविधा पुरवण्यात येत आहे. २0१८पर्यंत देशभरातील एकूण ४00 स्थानकांवर वायफाय सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सुरुवातीला २०१६पर्यंत १00 स्थानकांवर टप्प्याटप्प्याने वायफाय देण्यात येणार आहे. वायफाय सुविधेचा पहिला मान हा मुंबई सेंट्रल स्थानकाला मिळाला. या स्थानकात वायफाय सुविधा २0१६च्या जानेवारीत सुरू झाली. त्यानंतर आॅगस्ट महिन्यात आणखी १० स्थानकांवर सुविधा देण्यात आली. यामध्ये चर्चगेट, दादर, वांद्रे टर्मिनस, वांद्रे (लोकल), खार रोड आणि मध्य रेल्वेवरील एलटीटी, दादर, कल्याण, भायखळा, पनवेलचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
डिसेंबरपर्यंत वायफाय मिळणारी ७ स्थानके
पश्चिम रेल्वे - खार, अंधेरी, बोरीवली
मध्य रेल्वे - ठाणे, कल्याण, कुर्ला, घाटकोपर
उपनगरीय स्थानकांवर जानेवारी आणि त्यानंतर आॅगस्ट महिन्यात वायफाय सुरू झाल्यावर प्रत्येक आठवड्याला चार ते पाच लाख प्रवाशांकडून त्याचा लाभ घेण्यात येत आहे.