राहिल पिरजादेने पटकावला व्हाइस चॅन्सलरचा किताब, कल्याणच्या तरुणाचे सुयश, आॅस्ट्रेलियातील क्वीन्सलॅण्ड विद्यापीठात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 06:31 AM2017-10-19T06:31:59+5:302017-10-19T06:32:14+5:30
कल्याणच्या राहिल अब्दुल रज्जाक पिरजादे या तरुणाने आॅस्ट्रेलियातील क्वीन्सलॅण्ड विद्यापीठात व्हाइस चॅन्सलरचा किताब पटकावला.
-मुरलीधर भवार
कल्याण : कल्याणच्या राहिल अब्दुल रज्जाक पिरजादे या तरुणाने आॅस्ट्रेलियातील क्वीन्सलॅण्ड विद्यापीठात व्हाइस चॅन्सलरचा किताब पटकावला. परदेशी उच्च शिक्षणातील सुयशामुळे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राहिल हा कल्याणच्या भानुसागर टॉकीज परिसरात राहतो. त्याला शिक्षणाची आवड आहे. त्याचे शालेय शिक्षण के. सी. गांधी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून झाले. त्यानंतर, त्याने शेलू येथील जे. बी. आचार्य इंजिनीअरिंग कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतली. त्यानंतर, त्याला परदेशी शिक्षणासाठी जाण्याची इच्छा होती. त्यास त्याचे वडील अब्दुल रज्जाक पिरजादे यांनी संमती दिली. मुलांनी उच्च शिक्षण घेऊन आयुष्यात यशस्वी व्हावे, असा मानस कायम मनी ठेवणाºया अब्दुल रज्जाक यांनी राहिलची आॅस्ट्रेलियात शिक्षणाची व्यवस्था केली. त्याच्या शिक्षण व राहण्याचा खर्च एक लाखाच्या आसपास आहे. सगळा शिक्षणाचा भार आईवडिलांवर न टाकता तेथे पार्टटाइम जॉब करून स्वत: पैसे कमावून शिक्षण घ्यायचे, असा चंग त्याने मनाशी बांधला. त्याच्या या मेहनतीला यश आले. क्वीन्सलॅण्ड विद्यापीठात त्याने प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनल या विषयात प्रावीण्य मिळवले.
क्वीन्सलॅण्ड विद्यापीठात या प्रकारचे शिक्षण घेणारे सहा हजार विद्यार्थी आहेत. त्यातून १५ विद्यार्थ्यांना व्हाइस चॅन्सलर किताबासाठी निवडले गेले. त्यापैकी राहिल हा एक आहे. त्याला हा किताब जाहीर होताच त्याने अब्दुल रज्जाक यांना फोनवरून संपर्क साधून आनंदाची बातमी दिली. विद्यापीठाने या किताब प्रदान सोहळ्यात आईवडिलांना पाचारण करण्याची अनुमती राहिलला दिली होती. मात्र, वडिलांनी ही बातमी ऐकून खूप आनंद व्यक्त केला. मात्र, ते तेथे गेले नाहीत.
अब्दुल रज्जाक हे गुजरातमधून म्हैसाणा जातीच्या म्हशी विकत आणतात. त्या कल्याणमधील दुग्ध व्यावसायिकांना विकण्याचा व्यवसाय करतात. हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. स्वत: त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे.
ंसंपूर्ण कुटुंब उच्चशिक्षित
अब्दुल रज्जाक यांनी सुरुवातीपासून शिक्षणाला अधिक महत्त्व दिले आहे. मुलांनी खूप शिकावे आणि मोठे व्हावे, ही त्यांची इच्छा आहे. त्यांचा मोठा मुलगा साहिल हादेखील केमिकल इंजिनीअरिंग या विषयात सिडनी येथे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. त्यांची एक मुलगी बीएस्सी बीएड आहे. ती सध्या डोंबिवलीतील ओंकार इंटरनॅशनल शाळेत शिक्षिका आहे.
अब्दुल रज्जाक यांचा भाऊ मिनाज यांचा मुलगा मुक्शीद हा जर्मनीत उच्च शिक्षण घेत आहे. फॅब्रिकेशन या विषयात तो पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. रज्जाक यांच्या बहिणीची मुलगी स्त्रीरोगतज्ज्ञ आहे.
पिरजादे यांचे कुटुंबीय उच्च शिक्षण घेऊन देशाचे नाव परदेशात उंचावत आहेत. त्यांच्या मुलाला किताब मिळाल्याने कल्याणचीही शान जागतिक पातळीवर वाढली आहे.