विधान परिषदेच्या १० जागांसाठी ११ जण रिंगणात, भाजपने पंकजा मुंडेंना पुन्हा डावलले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 08:42 AM2022-06-09T08:42:49+5:302022-06-09T09:29:42+5:30
Legislative Council Election : राज्यसभेसाठी भाजपने दोन ऐवजी तिघांना रिंगणात उतरविल्याने ही निवडणूक बिनविरोध होवू शकली नव्हती. त्याची पुनरावृत्ती भाजपने विधान परिषद निवडणुकीतही केली.
मुंबई : दोन दिवसांवर असलेल्या राज्यसभा निवडणुकीत जोरदार लढत होत असताना २० जून रोजी होणारी विधान परिषदेची निवडणुकही अत्यंत अटीतटीची होण्याची चिन्ह आहेत. भाजपने बुधवारी पाच जण रिंगणात उतरविले. शिवसेना व काँग्रेसने दोन-दोन उमेदवारांची नावे जाहीर केली. राष्ट्रवादीच्या दोघांची नावे रात्रीपर्यंत जाहीर झालेली नव्हती. १० जागांसाठी ११ जण रिंगणात असल्याने राज्यसभेप्रमाणेच रस्सीखेच बघायला मिळणार आहे.
राज्यसभेसाठी भाजपने दोन ऐवजी तिघांना रिंगणात उतरविल्याने ही निवडणूक बिनविरोध होवू शकली नव्हती. त्याची पुनरावृत्ती भाजपने विधान परिषद निवडणुकीतही केली. या निवडणुकीसाठीचे मतदान गुप्त असते. शिवसेनेने सुभाष देसाई आणि दिवाकर रावते या दोघांनाही संधी नाकारत सचिन अहिर व नंदुरबारचे जुने शिवसैनिक आमशा पाडवी यांना संधी दिली. दोघांनीही बुधवारी अर्ज भरले. भाजपने पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा संधी नाकारली. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांच्याकडून पराभूत झालेले राम शिंदे यांचे पुनर्वसन केले.
प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय तसेच भाजप प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्ष उमा खापरे यांनाही उमेदवारी दिली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना पुन्हा उमेदवारी देताना प्रसाद लाड यांना पाचवे उमेदवार ठेवले आहे. काँग्रेसने माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप या दोन मुंबईकर नेत्यांना मैदानात उतरविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, माजी मंत्री एकनाथ खडसे, अमरसिंह पंडित, शिवाजीराव गर्जे ही नावे चर्चेत आहेत.
असे आहेत उमेदवार
शिवसेना : सचिन अहिर, आमशा पाडवी । भाजप : प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, उमा खापरे । काँग्रेस : चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप