लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मनसे कुठल्या पक्षासोबत युती करणार? राज ठाकरेंची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 12:59 PM2023-07-14T12:59:24+5:302023-07-14T13:00:09+5:30
Raj Thackeray: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाआघाडीतील घटक पक्षांची नव्याने मोर्चेबांधणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे कुठल्या पक्षासोबत युती करणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
२०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींपासून राज्यातील राजकारणामध्ये सुरू असलेली उलथापालथ जवळपास चार वर्षांनंतरही सुरू आहे. या काळात फोडाफोडीच्या राजकारणाचे अनेक प्रयोग राज्यात झाले. आता पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाआघाडीतील घटक पक्षांची नव्याने मोर्चेबांधणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष कुठल्या पक्षासोबत युती करणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. आता या प्रश्नाचं उत्तर खुद्द मनसेप्रमुखराज ठाकरे यांनीच दिलं आहे.
सध्या सुरू असलेल्या रत्नागिरी दौऱ्यादरम्यान, राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर लढणार की, कुठल्या पक्षासोबत युती किंवा आघाडी करणार असा प्रश्न विचारला असता राज ठाकरे म्हणाले की, सध्या हे जे काही महाराष्ट्रामध्ये चालू आहे, त्यात मी कुठल्या पक्षासोबत युती करेन, असं वाटत नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच असलं व्याभिचारी राजकारण मी करणार नाही. मला ते जमाणार नाही. तसेच ह्याला जर राजकारण म्हणत असाल तर तसं राजकारण करण्यास मी नालायक आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी गेल्या २-३ वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या मुद्द्यावरूनही राज ठाकरे यांनी टोला लगावला. गेली दोन तीन वर्षे राज्यातील निवडणुका प्रलंबित आहेत. अजूनही निवडणुकांची घोषणा होत नाही आहे. ज्याच्यावर कुणी बोलत नाही आहे. कुणी काही करत नाही आहे. नुसती चालढकल सुरू आहे, असा संताप राज ठाकरे यांनी व्यक्त केला.