वर्षभरातच लोक सरकारला कंटाळले
By admin | Published: November 3, 2015 02:45 AM2015-11-03T02:45:13+5:302015-11-03T02:45:13+5:30
भाजपा आणि शिवसेना सत्तेत असूनही राष्ट्रवादी-काँग्रेसने त्यांच्यापेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्त जागा जिंकल्या. यावरून एक वर्षाच्या आतच लोकांचा या सरकारबद्दल
मुंबई : भाजपा आणि शिवसेना सत्तेत असूनही राष्ट्रवादी-काँग्रेसने त्यांच्यापेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्त जागा जिंकल्या. यावरून एक वर्षाच्या आतच लोकांचा या सरकारबद्दल अपेक्षाभंग झाल्याचे सिद्ध होते, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात तटकरे म्हणाले की, आमच्या सरकारमधील दोन पक्षांमध्ये मतभेद होते, मात्र मनभेद नव्हते. पण या सरकारमधील दुहीचा दुष्परिणाम पहिल्याच वर्षात झालेला दिसतो. आजच्या निकालाने या सरकारच्या कामगिरीचा पंचनामा जनतेने केला आहे. सरकारवर मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण नाही, हे त्यांच्या वक्तव्यांवरूनच दिसत आहे.
शिवसेना आणि भाजपात कितीही वितुष्ट आलेले दिसत असले तरी शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याचे धाडस दाखविणार नाही, असे भाकीत तटकरे यांनी व्यक्त केले.
दुष्काळी उपाययोजनांच्या नावाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फसवणूक करीत असल्याचा आरोप करताना ते म्हणाले की, राज्यातील लाखो एपीएल कार्डधारकांना ७ रुपये किलोने गहू आणि ९ रुपये किलोने तांदूळ दिला जात होता, तो या सरकारने बंद केला. आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमध्ये दिलेली अन्नसुरक्षा नवीन नाही.
रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे यांच्या आणि स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात भाजपाचा पराभव झाला, यात बरेच
काही आले, असे तटकरे
म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)