कर्जमाफीशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही - रामदास कदम

By Admin | Published: June 10, 2017 07:28 PM2017-06-10T19:28:26+5:302017-06-10T19:28:26+5:30

शेतक-यांना कर्जमाफी दिल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी हिंगोलीत पत्रकार परिषदेत सांगितले.

Without the debt waiver, Shiv Sena will not be fit - Ramdas Kadam | कर्जमाफीशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही - रामदास कदम

कर्जमाफीशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही - रामदास कदम

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि. 10 - मुख्यमंत्री अभ्यासाच्या नावाखाली वेळकाढू भूमिका घेत असून शेतक-यांना कर्जमाफी देण्यासाठी कोणत्याही समितीची गरज नाही. शेतक-यांची अतिशय वाईट परिस्थिती आहे. त्यामुळे कर्जमाफी दिल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी हिंगोलीत पत्रकार परिषदेत सांगितले.
 
पुढे ते असेही म्हणाले की, आम्ही शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने हा दौरा करीत आहोत. या अभियानात पदाधिकारी नियुक्ती व जबाबदारी निश्चिती केली जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे १५ ते १७ जून या काळात कालावधीत शेतक-यांशी संवाद साधणार आहेत. 
 
शेतकयांच्या व्यथा जाणून घेणार आहेत. मुख्यमंत्री कर्जमाफीला तयार आहेत तर मग मागचे तीन महिने काय केले? सुकाणू समिती हे चालढकलीचे प्रयत्न आहेत. त्याची गरजच काय? असा सवाल केला. मुख्यमंत्र्यांची निवडणुकीची तयारी असेल तर शिवसेनाही तयार आहे. त्यांना सत्ता भोगण्यासाठी शिवसेनेची मदत लागते अन् बारामतीत जावून राष्ट्रवादी काँग्रेसशी चुंबाचुंबी करतात. ७0 हजार कोटींचा सिंचन घोटाळा करणारे राष्ट्रवादी काँग्रेसवाले आम्हाला सत्तेतून बाहेर का पडत नाहीत, असे विचारत आहेत. हे म्हणजे सौ चुहे खाके बिल्ली चली हज को, असा प्रकार आहे, अशीही खोचक टीका कदम यांनी केली
(अंतिम तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरू राहणार - राजू शेट्टी)
 
काँग्रेस व राष्ट्रवादीची मंडळीच शेतक-यांचे हाल होण्यास जबाबदार आहे. तर आता केंद्र व राज्यात दोन्हीकडे सत्ता असून भाजप कर्जमाफीवर निर्णय घेत नाही. बुलेट ट्रेनची काय गरज आहे. त्यावर खर्च करायला पैसा आहे. शेतक-याला राजा म्हणायचे अन् तो दारिद्र्यात खितपत मरतोय तरीही पहायचे नाही. शेतकºयांच्या प्रश्नावर राजकारण योग्य नाही. तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा पाच महिने लावले तर आणखी ५00 शेतक-यांचा बळी जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
 
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर कदम म्हणाले, शेतक-यांचा जगण्याचा हक्क आहे. त्यांना त्यांच्या रास्त मागण्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचाही अधिकार आहे. तो कर्जमुक्त व्हावा, स्वाभिमानी व्हावा, त्याच्या मालाला निदान उत्पादनखर्चापेक्षा जास्त भाव मिळावा, हीच त्याची भूमिका आहे. शासनलेखी १२५ रुपये मजुरीचा दर आहे. प्रत्यक्षात ५00 मोजावे लागतात. खते, बियाणांचे दरही वाढले. मग त्याच्या मालाचा भाव किती असावा, हे योग्य पद्धतीने ठरलेच पाहिजे. शेतक-यांचे कोणतीही प्रश्न असो शिवसेना कायम त्यांच्या पाठीशी उभी राहिली. समृद्धी महामार्गाचा प्रश्न असो, कर्जमाफीचा असो की अन्य कुठलाही. भविष्यातही हीच भूमिका कायम राहील. यावेळी आ.जयप्रकाश मुंदडा, आ.हेमंत पाटील, आ. नागेश पाटील आष्टीकर, जिल्हाप्रमुख संतोष बांगर आदींची उपस्थिती होती.
 
""ब्राह्मणाचा मंत्र वापरतील""
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभ्यासू आहेत. ते वकील आहेत. ते कायम अभ्यास करीत राहतात. त्यांना सगळे मंत्र माहिती आहेत. कोणाला ईडीत(अंमलबजावणी संचलनालय ) अडकवायचे, कोणाची चौकशी लावायची हे त्यांना माहिती आहे. शेतकरी कर्जमाफीसाठीही ते असाच ब्राह्मणाचा मंत्र वापरतील, असा चिमटाही त्यांनी काढला.

Web Title: Without the debt waiver, Shiv Sena will not be fit - Ramdas Kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.