मोदी नसते तर देश १५० वर्षे मागे गेला असता : डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 12:05 PM2019-08-12T12:05:28+5:302019-08-12T12:05:56+5:30
अध्यात्मिक ताकद वाढल्याशिवाय देशाची सेवा करण्याची ताकद निर्माण होणार नाही...
पुणे : राजकारण म्हणून नव्हे तर राष्ट्रकारण म्हणून हे पद मी स्वीकारले. मागील आठवड्यात संसदेमध्ये काश्मीरचे ३७० कलम, तीन तलाक अशा अनेक चांगल्याा घडामोडी घडल्या. पंतप्रधान आहेत म्हणून आपल्या देशाचा विकास होत आहे. ते नसते तर आपण अजून १५० वर्ष मागे गेलो असतो, असे मत गुरुवर्य ष. ब्र. १०८ डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी व्यक्त केले. सर्व लिंगायत समाजाला एकत्र करून ओबीसी प्रमाणपत्रासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
वीरमाहेश्वर जंगम व वीरशैव लिंगायत समाज यांच्यावतीने सोलापूर जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार गुरुवर्य ष. ब्र. १०८ डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन एरंडवणा येथील शामराम कलमाडी कॉलेज येथे करण्यात आले होते. यावेळी श्री क्षेत्र काशीपीठाचे जगद्गुरु श्री. श्री. श्री. १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, गुरुवर्य ष. ब्र. १०८ डॉ. निळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज, गुरुवर्य ष. ब्र. १०८ महादेव शिवाचार्य वाईकर महाराज, गुरुवर्य ष. ब्र. १०८ गंगाधर शिवाचार्य औंधकर महाराज,गुरुवर्य ष. ब्र. १०८ गुरुसिद्ध मणिकंठ दहीवडकर महाराज आमदार मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, महापौर मुक्ता टिळक, वीर माहेश्वर जंगम संस्थेचे अध्यक्ष महेश कुगावकर आणि संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी मदतनिधी गोळा करण्यात आला.
मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ‘एक योगी, एक महाराज हे राजकारणामध्ये कसे जाऊ शकतात. असे प्रश्न निर्माण होऊन अनेकांच्या भुवया उंचावल्या. परंतु अशा योगी, महाराजांनीच सत्ता हाती घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील योगीच आहेत. अंतर्मनाने ते योगी अवस्थेला पोहोचले आहेत. देशाची प्रगती करण्याची क्षमता अध्यात्मामध्ये आहे. अध्यात्मिक ताकद वाढल्याशिवाय देशाची सेवा करण्याची ताकद निर्माण होणार नाही.’
मुक्ता टिळक म्हणाल्या, ‘आपल्यासारख्या योगी लोकांनी राजकारणाला एक नवीन आयाम घालून दिला आहे. धर्माचे अनुष्ठान अधिकाधिक मिळेल यासाठी प्रयत्न करू. यातूनच भारताची प्रगती होईल.’ शिल्पा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.