नूतनीकरणाची अट नसताना अपंग प्रवाशांना भुर्दंड
By Admin | Published: June 13, 2016 11:26 PM2016-06-13T23:26:18+5:302016-06-13T23:29:15+5:30
बाळासाहेब जाधव ल्ल लातूर अपंगांच्या प्रमाणपत्राचे नूतनीकरण झाले नसल्याच्या नावाखाली एसटी महामंडळाकडून अपंग प्रवाशांकडून १०० टक्के प्रवास भाडे आकारले जात आहे़
बाळासाहेब जाधव ल्ल लातूर
अपंगांच्या प्रमाणपत्राचे नूतनीकरण झाले नसल्याच्या नावाखाली एसटी महामंडळाकडून अपंग प्रवाशांकडून १०० टक्के प्रवास भाडे आकारले जात आहे़ ५ वर्षातून एकदा नूतनीकरण करण्याची पद्धत होती़ मात्र आता ती पद्धत रद्द करण्यात आली आहे़ परंतू, काही वाहक अपंग प्रवाशांची अडवणूक करून त्यांच्याकडून १०० टक्के भाड्याची वसुली करीत आहेत़ गेल्या महिनाभरात १५ अपंगांनी महामंडळाकडे तक्रार करूनही प्रवासीभाडे आकारले जात आहे.
राज्य शासनाने अंध व अपंग व्यक्तींना ७५ टक्के व त्यांच्या साथीदारांना ५० टक्के प्रवास भाडे सवलत देण्याचा निर्णय आहे़ या सवलतीसाठी अपंग कल्याणचे आयुक्त अथवा त्यांनी नियुक्त केलेल्या जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांनी दिलेल्या ओळखपत्राच्या आधारे प्रवास भाड्यातील सवलत दिली जाते. पास व प्रमाणपत्राचे नूतनीकरण करण्याचा कालावधी ५ वर्षाचा देण्यात आला होता़ परंतू, आता ही पद्धत रद्द करण्यात आली आहे. एकदा प्रमाणपत्र दिल्यानंतर नूतनीकरणाची गरज नाही, असा शासन निर्णय आहे. परंतु, लातूर महामंडळाच्या बसेस अपंग प्रवाशांकडून १०० टक्के प्रवासी भाडे घेत आहेत.
जिल्ह्यात ५ आगाराअंतर्गत एप्रिल २०१५ ते २०१६ या कालावधीत अस्थिव्यंग १ हजार ४३१, कर्णबधीर ४१०, अंध ६९५, मतिमंद ३०६ अशा एकूण २ हजार ८४२ अपंगांकडे प्रमाणपत्र आहे. यातील १५ जणांनी एस.टी. प्रशासनाकडे १०० टक्के भाडे आकारले जात असल्याचे गाऱ्हाणे मांडले आहे. परंतु, प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली नाही. नूतनीकरणाची अटच नसताना सवलतीचा लाभ मिळत नसल्याचे अपंग प्रवाशांनी प्रशासनाकडे सांगितले. परंतु, त्याकडे दुर्लक्ष होत आहे.