शिवसेनेच्या सोबतीशिवाय विजय मिळवणे कठीण, मुख्यमंत्री चिंतीत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2018 07:43 PM2018-06-04T19:43:54+5:302018-06-04T19:43:54+5:30
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत झालेला पराभव, देशपातळीवर विरोधी पक्षांचे होत असलेले ऐक्य आणि महाराष्ट्रात शिवसेनेने स्वबळावर लढण्याची केलेली घोषणा यामुळे केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाच्या नेत्यांना घाम फुटला आहे.
मुंबई - उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत झालेला पराभव, देशपातळीवर विरोधी पक्षांचे होत असलेले ऐक्य आणि महाराष्ट्रात शिवसेनेने स्वबळावर लढण्याची केलेली घोषणा यामुळे केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाच्या नेत्यांना घाम फुटला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय विजय मिळवणे कठीण असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मात्र शिवसेनेसोबत युती होवो वा न होवो, कार्यकर्त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू करावी, असेही त्यांनी सांगितले.
नुकतीच राज्यातील दोन मतदारसंघात झालेली पोटनिवडणूक आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीविषयी चर्चा करण्यासाठी मुंबईतील दादर येथील वसंत स्मृती येथे भाजपा नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आगामी निवडणुकीत शिवसेनेची भूमिका काय असेल, याचा अंदाज बांधण्यात आला. शिवसेनेशिवाय निवडणूक लढवण्याची वेळ आली तर पक्षाच्या रणनीतीबाबत चर्चा झाली. यावेळी संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी आगामी निवडणुकीत शिवसेनेची सोबत आवश्यक असेल, असे सांगितले. तसेच शिवसेनेसोबत युती न झाल्यास कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्यास तयार राहावे, असेही त्यांनी सांगितले.
भाजपाने शिवसेनेसोबत युती नसतानाही पालघरमध्ये विजय मिळवला होता. भाषणादरम्यान मुख्यमंत्र्यांनी या विजयाचाही उल्लेख केला. मात्र पालघरमध्ये शिवसेनेचे आव्हान परतवून लावताना भाजपाची दमछाक झाली होती. शिवसेनेसोबतच्या युतीबाबत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे विचारणा केली असता दानवेंनी शिवसेना अद्यापही आमच्यासोबत सरकारमध्ये आहे. एका पोटनिवडणुकीत ते आमच्या विरोधात लढले आहेत. मात्र चर्चेची शक्यता अद्यापही कायम असल्याचे दानवे म्हणाले.