कोपर्डी प्रकरणी पीडितेच्या बहिणीची साक्ष
By admin | Published: January 5, 2017 04:06 AM2017-01-05T04:06:16+5:302017-01-05T04:06:16+5:30
अत्याचाराची घटना घडण्यापूर्वी आरोपी माझ्या बहिणीचा पाठलाग करून तिला धमकी देत होते़ ही बाब तिने मला सांगितली तेव्हा, तू धीट हो त्यांना घाबरू नकोस
अहमदनगर : अत्याचाराची घटना घडण्यापूर्वी आरोपी माझ्या बहिणीचा पाठलाग करून तिला धमकी देत होते़ ही बाब तिने मला सांगितली तेव्हा, तू धीट हो त्यांना घाबरू नकोस, असा धीर मी तिला दिला होता, असे सांगत या घटनेचा क्रम कोपर्डीतील मृत पीडित मुलीच्या बहिणीने बुधवारी न्यायालयात सांगितला़
कोपर्डी खटल्याची जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू असून, बुधवारी सरकारी पक्षाच्या वतीने अॅड़ उज्ज्वल निकम यांनी पीडित मुलीच्या बहिणीची व आणखी एका साक्षीदाराची साक्ष घेतली़ या वेळी आरोपीच्या वतीने अॅड़ प्रकाश आहेर, अॅड़ योव्हान मकासरे व अॅड़ खोपडे यांनी उलटतपासणी घेतली़ या खटल्यात पीडित मुलीच्या बहिणीने सांगितले की, जितेंद्र शिंदे याच्यासह संतोष भवाळ व नितीन भैलुमे यांनी घटनेपूर्वी दोन दिवस आधी माझ्या बहिणीचा पाठलाग केला होता़ ही बाब तिने मला सांगितली तेव्हा मी तिला धीर दिला होता. तसेच या वेळी पोलिसांनी जप्त केलेल्या वस्तूंची या मुलीने ओळख पटविली़ दुसरा साक्षीदार असलेल्या मयत मुलीच्या नातेवाइकाने लिंबाच्या झाडाखाली रडण्याचा आवाज आला तेव्हा तिकडे गेलो होतो, असे सांगितले़