आई-वडिलांच्या भांडणात मुलांना साक्षीदार करणे गैर, हायकोर्टाचा निकाल : कोणीही जिंकले तरी मुलांचेच नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 04:46 AM2017-10-11T04:46:07+5:302017-10-11T04:46:28+5:30
घटस्फोटासाठी न्यायालयात सुरू असलेल्या वादात त्या दाम्पत्याच्या लहान मुलाचा सारीपाटावरील सोंगटीसारखा वापर केला जाऊ शकत नाही, असे नमूद करून मुंबई उच्च न्यायालयाने एका घटस्फोट प्रकरणात
विशेष प्रतिनिधी
मुंबई : घटस्फोटासाठी न्यायालयात सुरू असलेल्या वादात त्या दाम्पत्याच्या लहान मुलाचा सारीपाटावरील सोंगटीसारखा वापर केला जाऊ शकत नाही, असे नमूद करून मुंबई उच्च न्यायालयाने एका घटस्फोट प्रकरणात आठ वर्षांच्या मुलीला वडिलांच्या बाजूने साक्षीदार म्हणून बोलाविण्यास नकार दिला.
पुण्यात संभाजी नगर, आळंदी रोड, भोसरी येथे राहणा-या राहुल शेडगे यांनी पत्नी छळ करते या कारणावरून घटस्फोटासाठी केलेली याचिका तेथील दिवाणी न्यायालयात पाच वर्षे प्रलंबित आहे. त्या प्रकरणात श्रुती या आपल्या मुलीला, तिची आई आपला कसा छळ करते हे सिद्ध करण्यासाठी साक्षीदार म्हणून बोलवावे, असा अर्ज राहुल यांनी केला होता. एक तर श्रुतीचे वय लहान आहे. शिवाय चार वर्षे तिचा ताबा वडिलांकडे असल्याने ती वडिलांनी पढविल्याप्रमाणे साक्ष देण्याची शक्यता आहे, असे म्हणून पुण्याच्या न्यायालयाने श्रुतीला साक्षीदार म्हणून बोलाविण्यास नकार दिला होता.
याविरुद्ध उच्च न्यायालयात रिट याचिका करून राहुल यांनी असे म्हणणे मांडले की, श्रुती जरी आठ वर्षांची असली तरी तिला चांगली समज आहे. शिवाय घरात होणारी भांडणे आणि आईचे तिरसट वागणे तिने प्रत्यक्ष पाहिले असल्याने पत्नीकडून होणारा छळ सिद्ध करण्यास ती महत्त्वाची साक्षीदार आहे.
न्या. डॉ. शालिनी फणसाळकर-जोशी यांनी राहुलची याचिका फेटाळून पुणे न्यायालयाचा निर्णय योग्य ठरविला. न्या. जोशी यांनी यासाठी पुणे न्यायालयाने दिलेल्या कारणाखेरीज वेगळे आणि महत्त्वाचे कारण नमूद करताना म्हटले की, आई-वडिलांच्या घटस्फोटासाठीच्या कोर्टकज्ज्यात मुलांना साक्षीदार केले जाणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. या भांडणात आई किंवा वडील कोणीही जिंकले तरी खरा पराभव मुलांचाच होणार असतो. कारण घटस्फोटाने त्यांना दोन्ही पालकांच्या प्रेमाला मुकावे लागते.
न्या. जोशी म्हणतात की, मुळात आई-वडिलांचा घटस्फोट हीच लहान मुलांच्या कोवळ्या मनावर कळत-नकळत आघात करणारी घटना असते. यामुळे त्यांचे शैशव अकाली हिरावून घेतले जाते. त्यात आणखी आई किंवा वडील यांच्यापैकी कोणाला तरी खोटे ठरविण्यासाठी त्यांना कोर्टात येऊन साक्ष द्यायला लावणे हे त्यांच्या दुखºया मनावर डागण्या देण्यासारखे आहे. आई-वडिलांच्या घटस्फोटासाठी सुरू असलेल्या भांडणात मुलांचा सारीपाटावरील सोंगटीसारखा वापर करू दिला जाऊ शकत नाही.
शिवाय घटस्फोटाच्या प्रकरणात मुलांचे हित सर्वोच्च मानले जावे, हे सर्वमान्य न्यायतत्त्व आहे. त्यादृष्टीनेही वडिलांना घटस्फोट मिळावा यासाठी मुलांना कोर्टात येऊन आई कशी वाईट आहे हे सांगायला लावणे हे चुकीचे आहे, असेही न्या. जोशी यांनी नमूद केले.
कोर्ट हा तिसरा पालक-
न्या. जोशी यांनी निकालपत्रात म्हटले की, मुलांचा विचार करताना घटस्फोटाचे प्रकरण पती व पत्नी या दोन पक्षकारांपुरते मर्यादित नसते. त्या दोघांच्या भांडणात मुलांचे अहित होऊ नये यासाठी न्यायालयास तिसºया पालकाची भूमिका बजावावी लागते. प्रस्तुत प्रकरण पाच वर्षांपूर्वी दाखल झालेले आहे व त्यात पत्नीविरुद्धचे छळाचे आरोप त्यापूर्वीचे आहेत. त्यामुळे आज आठ वर्षांची असलेली श्रुती घरात या घटना घडल्या तेव्हा जेमतेम दोन-तीन वर्षांची असणार. त्यामुळे दोन वर्षांची असताना काय घडले हे तिला आठवायला लावून आई किंवा वडील यापैकी कोणाला तरी खोटे ठरवायला भाग पाडणे, हे तिच्या कोवळ्या मनासाठी क्लेषकारक आहे.