उद्धव ठाकरेंतर्फे साक्षी-पुरावे पूर्ण
By admin | Published: October 21, 2015 03:19 AM2015-10-21T03:19:08+5:302015-10-21T03:19:08+5:30
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीवरून त्यांचा ज्येष्ठ मुलगा जयदेव ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात न्यायालयीन लढा सुरू आहे. दावेदार उद्धव ठाकरे यांच्यातर्फे
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीवरून त्यांचा ज्येष्ठ मुलगा जयदेव ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात न्यायालयीन लढा सुरू आहे. दावेदार उद्धव ठाकरे यांच्यातर्फे सर्व साक्षीदारांची साक्ष तपासून झाल्याचे त्यांच्या वकीलाने उच्च न्यायालयापुढे जाहीर केले. त्यामुळे आता जयदेव ठाकरे यांना त्यांचे साक्षीदार व कागदपत्रे उच्च न्यायालयापयढे सादर करावे लागणार आहेत. खुद्द जयदेव ठाकरे उच्च न्यायालयात साक्ष देणार आहेत की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जयदेव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या इच्छापत्राला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. अखेरच्या दिवसांत बाळासाहेब उद्धव ठाकरेंच्याच निगराणीखाली असल्याने उद्धव यांच्या दबावाखाली हे इच्छापत्र बनवण्यात आल्याचा आरोप जयदेव यांनी केला आहे. न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठापुढे या दाव्यावरील सुनावणी सुरू आहे. सोमवारच्या सुनावणीवेळी सेनेचे प्रवक्ते व बाळासाहेबांच्या निकटवर्तीयांपैकी एक असलेले अनिल परब यांची अर्धवट राहिलेली उलटतपासणी पूर्ण करण्यात आली.
आत्तापर्यंत उद्धव ठाकरे यांच्यातर्फे बाळासाहेबांचे इच्छापत्र बनवणारे अॅड. फ्लेमिन डिसोझा, डॉ. जलील परकार आणि अनिल परब यांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांची साक्ष नोंदवण्यास टाळले असले, तरी त्यांच्या वकिलांनी आवश्यकता भासेल तेव्हा त्यांची साक्ष नोंदवण्याची मुभा खंडपीठाकडून घेतली आहे.
आता जयदेव ठाकरे यांना त्यांच्या दाव्याला बळकटी देणारे साक्षीदार आणि कागदपत्रे खंडपीठापुढे सादर करावी लागणार आहेत. ‘तुम्ही (जयदेव ठाकरे) कोणते साक्षीदार आणि कागदपत्रे सादर करणार, आता तुम्हाला यावर निर्णय घ्यावाच लागेल,’ असे म्हणत न्या. पटेल यांनी ११ डिसेंबरपर्यंत या संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश जयदेव ठाकरे यांना दिले. (प्रतिनिधी)