विझक्राफ्टवर अखेर गुन्हा दाखल
By admin | Published: February 27, 2016 03:01 AM2016-02-27T03:01:20+5:302016-02-27T03:01:20+5:30
महाराष्ट्र रजनी कार्यक्रमात लागलेल्या आगीप्रकरणी सादर केलेल्या अहवालात आयोजक कॉन्फिड्रेशन आॅफ इंडिया इंडस्ट्रीज आणि इव्हेंट मॅनेजमेंट विझक्राफ्ट इंटरनॅशनल एंटरटेनमेंट या
मुंबई : महाराष्ट्र रजनी कार्यक्रमात लागलेल्या आगीप्रकरणी सादर केलेल्या अहवालात आयोजक कॉन्फिड्रेशन आॅफ इंडिया इंडस्ट्रीज आणि इव्हेंट मॅनेजमेंट विझक्राफ्ट इंटरनॅशनल एंटरटेनमेंट या
कंपनीला जबाबदार धरण्यात आले होते. या दोन्ही कंपन्यांना जबाबदार धरलेले असतानाही डी.बी. मार्ग पोलिसांनी केवळ विझक्राफ्ट कंपनीविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.
गिरगाव चौपाटी येथे १४ फेब्रुवारी रोजी आयोजित ‘महाराष्ट्र रजनी’ कार्यक्रमात लागलेली आग सदोष वायरिंगमुळे लागल्याचे अग्निशमन दलाच्या अहवालातून समोर आले. कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात रोशणाई, एलईडी, फ्लेक्स, साऊंड सिस्टम, कॅमेरे आदीसाठी स्वतंत्र वायरिंग होती़
सुरक्षेची खबरदारी न घेताच या वायरिंगचे जाळे स्टेजच्या आसपास व परिसरात लटकत होते़ यापैकी एखाद्या वायरिंगमधून उडालेल्या आगीच्या ठिणग्या ज्वलनशील वस्तूंच्या संपर्कात आल्याने आग भडकली, असा निष्कर्ष अग्निशमन दलाने काढला आहे़ त्यात १५ गॅस सिलिंडर व अन्य ज्वलनशील वस्तूंचा साठा स्टेजखाली असल्याने ही आग वेगाने पसरल्याचे अग्निशमन दलाने पालिकेला सादर केलेल्या
अहवालात स्पष्ट केले होते. या प्रकरणी आयोजक कॉन्फिड्रेशन आॅफ इंडिया इंडस्ट्रीज आणि इव्हेंट
मॅनेजमेंट विझक्राफ्ट इंटरनॅशनल एंटरटेनमेंट या कंपनीला जबाबदार धरण्यात आले होते.
दरम्यान, अहवालानुसार विझक्राफ्ट कंपनी आगीला
जबाबदार असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार त्यांनी विझक्राफ्टविरुद्ध डी.बी. मार्ग पोलिसांनी भारतीय दंड संहितेतील ३३६, २८५ कलमान्वये गुन्हा
नोंदवला. निष्काळजीपणामुळे उपस्थित सर्वांच्या जिवाला धोका निर्माण होईल असे कृत्य करणे, स्टेजखालील ज्वालाग्रही पदार्थांमुळे उद्भवणारा संभाव्य धोका
माहीत असूनही सुरक्षेच्या उपाययोजना न करणे असा आरोप कंपनीवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत ७ ते ८ जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. डी.बी. मार्ग पोलीस विझक्राफ्ट कंपनीतील महाराष्ट्र रजनीचे काम करणारा
नेमका अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी करणार आहेत.
(प्रतिनिधी)
संपूर्ण कंपनी आगीला जबाबदार नाही. जबाबदारी निश्चित करण्यासाठी चौकशी केली जाईल. त्यानंतर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस प्रवक्ते उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी दिली.