शिवसेना नगरसेवकावर महिलेने भिरकावली चप्पल

By admin | Published: May 3, 2017 05:48 AM2017-05-03T05:48:37+5:302017-05-03T05:48:37+5:30

पश्चिमेकडील लालचौकी परिसरात राहणाऱ्या ६४ वर्षीय विठाबाई शिंदे यांनी शिवसेना नगरसेवक मोहन उगले यांच्या

A woman carrying a Shiv Sena corporator throws a slippers | शिवसेना नगरसेवकावर महिलेने भिरकावली चप्पल

शिवसेना नगरसेवकावर महिलेने भिरकावली चप्पल

Next

कल्याण : पश्चिमेकडील लालचौकी परिसरात राहणाऱ्या ६४ वर्षीय विठाबाई शिंदे यांनी शिवसेना नगरसेवक मोहन उगले यांच्या दिशेने महापालिका मुख्यालयात मंगळवारी चप्पल भिरकावली.
शिंदे यांनी उगले यांची कॉलर पकडली. उगले यांनी विठाबाईंचा हात झटकला असता तिने उगले यांच्या दिशेने चप्पल भिरकावली. महापालिका मुख्यालयात झालेल्या या घटनेमुळे सुरक्षा रक्षकांची पळापळ झाली. त्यांनी उगले व विठाबाई या दोघांनाही कसेबसे दूर केले. विठाबाई यांच्यासोबत असलेला मुलगा अशोक याला उगले यांनी ठोसा लगावला. उगले यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी अशोक याने बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली.
विठाबाई या लालचौकी परिसरातील शिंदे मळा येथे राहतात. त्यांनी त्यांच्या घरासमोर शेड उभारली आहे. ही शेड बेकायदा असल्याची तक्रार नगरसेवक उगले यांनी केली होती. उगले यांच्या तक्रारीवरून प्रभाग अधिकाऱ्यांनी ही शेड तोडण्याची कारवाई केली. उगले यांना धडा शिकवण्याकरिता शिंदे यांनी त्यांनी त्यांच्या घरासमोर उभारलेली शेड बेकायदा उभारली आहे. तसेच ठाणकार पाडा येथे बेकायदा शिवसेना शाखा उभी केली असल्याची तक्रार प्रभाग अधिकाऱ्यांकडे केली. प्रभाग अधिकारी उगले यांच्या बेकायदा शेड व शिवसेना शाखेवर कारवाई करीत नसल्याच्या निषेधार्थ विठाबाई यांनी लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला होता. उपोषणाचा इशारा देणारी पाटी हातात घेऊन त्यांनी प्रवेशद्वारासमोर बसण्याचा प्रयत्न केला असता सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या हातातील पाटी हिसकावून घेत मुख्यालयाच्या आवाराबाहेर उपोषण करा, असा सल्ला दिला. राष्ट्रवादीचे पदाधिकारी मदन दराडे यांनी विठाबाईंना आंदोलन करण्यापासून मज्जाव करुन नका, असे बजावत सुरक्षा रक्षकांशी हुज्जत घातली. त्याचवेळी नगरसेवक उगले हे मुख्यालयात आले. पालिका मुख्यालयातील काम करुन ते पुन्हा परतत असताना संतप्त विठाबाई यांनी उगले यांची कॉलर पकडली. उगले यांनी विठाबाईंचा हात झटकताच उगले यांच्या दिशेने चप्पल भिरकावली. संतप्त उगले विठाबाईंशी दोन हात करीत असल्याचे पाहून सुरक्षा रक्षकांनी उगले यांना दूर लोटले. यावेळी विठाबाई यांचा मुलगा अशोक याला उगले यांनी रागाच्या भरात एक ठोसा लगावला. भाजपा नगरसेवक दया गायकवाड, शिवसेना नगरसेविका छाया वाघमारे यांनी उगले यांना आवरण्याचा प्रयत्न केला. नगरसेवकाला काही किंमत आहे की नाही असा संतप्त सवाल उगले यांनी केला. अशोक याने उगले यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. तोवर विठाबाई यांनी सुरक्षारक्षकांसमोर कॉलर पकडल्याचा दावाही उगले यांनी केला. माझ्याविरूद्ध राजकीय षड््यंत्र सुरू असल्याचा आरोपही उगले यांनी केल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले.
नंतर रक्तदाब वाढल्याने अशोक रूग्णालयात दाखल झाला. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.
दरम्यान उगले यांच्या विरोधात मनसेच्या माजी नगरसेविका मनिषा डोईफोडे यांनी उपोषण केले होते. उगले यांनी मनिषा यांच्या विरोधात अपशब्द व जातीवाचक शब्द वापरल्याने उगले यांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण ताजे असताना आता उगले यांच्या दिशेने तक्रारदार महिलेने चप्पल भिरकावल्याने ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. (प्रतिनिधी)

... हे तर माझ्याविरूद्ध राजकीय षडयंत्र
यासंदर्भात उगले म्हणाले, विठाबाईंच्या उपोषणाला मी विरोध केला नसताना त्यांनी सुरक्षा रक्षकांच्यासमक्ष माझी कॉलर पकडली आणि माझ्यावर चप्पल भिरकावली. या प्रकरणामागे राजकीय षंड्यंत्र आहे. फडके रोडवरील ओपन जिमच्या वेळी मला मदन दराडे व मनिषा डोईफोडे यांनी विरोध केला होता. माझा कार्यक्रम उधळून लावला होता. तेव्हापासून माझ्या विरोधात संबंधित व्यक्ती तक्रारी करीत आहेत. डोईफोडे नगरसेविका असताना त्यांच्या विकास कामाला मी कधी विरोध केला नाही. मग त्यांनी माझ्या विकासकामांना विरोध करण्याचे कारण काय?

Web Title: A woman carrying a Shiv Sena corporator throws a slippers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.