महिलेचा मृत्यू; एकास अटक
By admin | Published: October 3, 2016 02:00 AM2016-10-03T02:00:35+5:302016-10-03T02:00:35+5:30
शेतमजूर महिलेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी बावड्यातील एकाविरुद्ध इंदापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला
इंदापूर : जमीन देण्याचे आमिष दाखवून बारा वर्षे शारीरिक शोषण करून शेतमजूर महिलेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी बावड्यातील एकाविरुद्ध इंदापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यास अटक करण्यात आली आहे.
राजेंद्र केरबा पिसे (वय ४६, रा. बावडा, ता. इंदापूर) असे आरोपीचे नाव आहे. लताबाई ज्ञानदेव गुराळकर (वय ४६, रा. वकीलवस्ती, ता. इंदापूर) असे मरण पावलेल्या शेतमजूर महिलेचे नाव आहे.
तिच्या मुलीने दि. २९ रोजी रात्री या संदर्भात फिर्याद दिली आहे. त्यामध्ये आरोपीने आपल्या आईस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असे म्हटले आहे. तर फिर्यादीच्या भावाने आरोपीने व साथीदाराच्या मदतीने तिचा खून केला असल्याचा आरोप तालुका कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे.
वडील व भावांनी गावात बेअब्रू होईल या भीतीने तक्रार दिली नव्हती. मात्र, आपण देत आहोत, असे लताबाईच्या मुलीने फिर्यादीत म्हटले आले. दोन एकर जमीन देण्याचे आश्वासन दिले. फिर्यादीच्या भावाने २८ सप्टेंबर रोजी तालुका कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यामध्ये आपल्या आईचे आरोपी पिसेबरोबर असलेले संबंध तोडावेत, तिला कामावरुन काढावे, असा पिसे याच्या आईवडील व पत्नीचा आग्रह होता.
तिला जमीन देण्यासही त्यांचा विरोध होता. या बाबीवर तोडगा काढण्यासाठी दि. १ सप्टेंबर रोजी आरोपीने मयत लताबाईला रानात बोलावले. तिच्यावर शारीरिक अत्याचार करून जिवे मारून विहिरीत टाकले. विवस्त्र अवस्थेत विहिरीतील मृतदेह विद्रूप झाला होता, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. या प्रकरणाची या पूर्वी दि. १६ सप्टेंबर रोजी इंदापूर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मयत दप्तरी नोंद करण्यात आली होती.
योगेश घोगरे यांनी मयताची खबर दिली होती. भीमशक्ती संघटनेचे तालुकाध्यक्ष युवराज पोळ, बाळासाहेब भोळे, प्रकाश भोसले, मनोज नागटिळक, हमीद शिकलकर, सतीश दोरकर यांनी थेट आरोपीवर कारवाई करण्यात यावी, यासाठी दि. २७ सप्टेंबरपासून इंदापूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली. या दणक्याने काल पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्याचे आदेश दिले. त्यामुळे पुढील कारवाई झाली.
>मयत लताबाई ही गेल्या सतरा वर्षांपासून राजेंद्र पिसे याच्या बावडा येथील रानात काम करत होती. तिला दोन एकर जमीन देतो, असे सांगून बारा वर्षांपासून त्याने तिच्याशी शारीरिकसंबंध केले होते. ती त्याच्याच रानात राहात होती. त्यांच्या अवैध संबंधाबद्दल सर्वांना माहिती होती.
चार वर्षांपासून जमीन देण्याच्या कारणावरून त्यांच्यात खटके उडण्यास सुरुवात झाली. २ आॅगस्ट २०१६ रोजी सायंकाळी सात वाजता आरोपीने तिला तिच्या वकीलवस्ती येथील घरासमोर तुझ्या नावावर जमीन करणार नाही, जमीन देणार नाही, असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. १ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता लताबाई घरातून निघून गेली होती. ती परतली नाही.
सर्वत्र शोध घेतला, पण सापडली नाही. १६ सप्टेंबर रोजी सकाळी पावणेबाराच्या सुमारास वकीलवस्ती येथील योगेश दादासाहेब घोगरे यांच्या विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला.