‘ती’ महिला अखेर पॉस्कोअंतर्गत गजाआड
By admin | Published: April 3, 2015 02:26 AM2015-04-03T02:26:04+5:302015-04-03T02:26:04+5:30
दहावीतल्या विद्यार्थ्याला गुंगीचे औषध देऊन आपल्या वासनेची शिकार बनवणाऱ्या ‘त्या’ महिलेस अखेर आरसीएफ पोलिसांनी पॉस्को कायद्यांतर्गत अटक केली
मुंबई : दहावीतल्या विद्यार्थ्याला गुंगीचे औषध देऊन आपल्या वासनेची शिकार बनवणाऱ्या ‘त्या’ महिलेस अखेर आरसीएफ पोलिसांनी पॉस्को कायद्यांतर्गत अटक केली. आज तिला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने या महिलेला ४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.
चेंबूरच्या वाशी नाका परिसरात राहणाऱ्या या १६वर्षीय मुलासोबत या ४०वर्षीय महिलेने तीन महिने लैंगिक अत्याचार केले होते. याबाबत मुलाच्या कुटुंबीयांनी आरसीएफ पोलिसांना लेखी तक्रार दिली होती. मात्र तीन दिवस उलटूनही पोलिसांकडून गुन्हा दाखल होत नसल्याने या मुलाची व्यथा ‘लोकमत’ने बुधवारच्या अंकात मांडली. त्यानुसार आरसीएफ पोलिसांनी बुधवारी सायंकाळीच या महिलेवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर आज सकाळी या महिलेला पोलिसांनी तिच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली.
गेले तीन महिने ही महिला या मुलाला आणि त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार करत होती. त्यामुळे घाबरलेला हा मुलगा निमूटपणे तिचे हे अत्याचार सहन करत होता. मात्र दिवसेंदिवस त्याची प्रकृती खालावत असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याची विचारपूस केली. तेव्हा परीक्षेचा ताण असल्याचे सांगत तो त्यांना टाळत होता. याच दरम्यान या मुलाने आत्महत्यादेखील करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच आम्हाला ही बाब समजल्याने त्याचा जीव वाचल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यातच या अत्याचाराचा परिणाम परीक्षांवरदेखील झाला आहे.
मात्र आरसीएफ पोलिसांनी आणि आमच्या काही मित्रांनी मुलाला योग्य मदत केल्याने सध्या तो तणावातून बाहेर आला असल्याचेदेखील त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. (प्रतिनिधी)