जमीन बळकावण्याचा विरोध केल्याने महिलेला मारहाण
By admin | Published: January 30, 2017 05:26 PM2017-01-30T17:26:38+5:302017-01-30T17:26:38+5:30
इंदापूर तालुक्यात खासगी सावकारीने उच्छाद मांडला आहे.
ऑनलाइन लोकमत
इंदापूर, दि. 30 - इंदापूर तालुक्यात खासगी सावकारीने उच्छाद मांडला आहे. प्रजासत्ताकदिनीच सावकारीतून जमीन बळकावण्याचा प्रयत्न करणारास विरोध करणाऱ्या महिलेचे अंगावरील कपडे फाडून तिला मारहाण केल्याची घटना बळपुडी (ता. इंदापूर ) येथे घडली. या प्रकरणी एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
महादेव शंकर देवकाते, सदाशिव शंकर देवकाते, अमोल महादेव देवकाते, छबाबाई महादेव देवकाते (सर्व रा. बळपुडी) अशी आरोपींची नावे आहेत. मारहाण झालेल्या महिलेने त्यांच्या विरुध्द इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. इंदापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी जनावरांना गवत आणण्याकरिता बळपुडी येथील गट नं. ५६ मधील तिच्या मालकीच्या शेतामध्ये गेली होती. तेथे आरोपी महादेव शंकर देवकाते, सदाशिव शंकर देवकाते, अमोल महादेव देवकाते, छबाबाई महादेव देवकाते हे फिर्यादीच्या शेताची मोजणी करून पाईपलाईनकरिता चारीचे खोदकाम करीत होते. त्यावेळी माझ्या शेतात येऊ नका.
चारीचे खोदकाम करू नका, असे फिर्यादीने म्हणताच महादेव शंकर देवकाते म्हणाला की, माझे व्याजाने घेतलेले तीन लाख रुपये दे. अथवा कोर्टातील दावा माझ्या सांगण्याप्रमाणे करून दे, असे म्हणतच चारीच्या खोदकामास विरोध केल्याने चिडून आरोपींनी फिर्यादीस दगडाने हातातील लाकडी दांडक्याने पायावर, डोक्यावर, दोन्ही हातांवर मारले. शिवीगाळ, दमदाटी केली. जिवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीमध्ये फिर्यादीच्या अंगावरील कपडे फाडले. गळ्यातील सोन्याचे एक तोळ्याचे मंगळसूत्र तुटून गहाळ झाले, असे फिर्यादीत म्हटले आहे. सध्या फिर्यादीवर उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत. हवालदार शंकरराव वाघमारे प्रकरणाचा तपास करीत आहेत.