महिलेने पोलीस ठाण्याच्या आवारातच घेतले विष
By admin | Published: July 10, 2015 01:33 AM2015-07-10T01:33:28+5:302015-07-10T01:33:28+5:30
अकोला जिल्ह्यातील घटना; पोलीस कारवाई करीत नसल्याने उचलले पाऊल
कवठा (जि. अकोला ): तक्रार दिल्यानंतरही पोलीस कारवाई करीत नसल्याने उद्विग्न झालेल्या शालू भाऊराव हातोलेने (४२. रा. बहादुरा) उरळ पोलीस ठाण्याच्या आवारातच विष प्राशन केल्याची घटना गुरुवारी घडली.
शालू हातोले यांचे पती भाऊराव हातोले यांनी दिलेल्या माहितीनुसार ते सुकळी येथे राहतात. शालूचा भाऊ भीमराव घ्यारे यांनी त्यांना बहादुरा येथे एक एकर शेती दिली आहे. त्यामुळे ते पाच महिन्यांपूर्वी बहादुरा येथे राहण्यास आले; मात्र शेतीवरून भाऊ आणि बहिणीमध्ये वाद सुरू झाले. वादातून शालू हातोले यांच्या घरावरील टिनपत्र्यांचे नुकसान करण्यात आले. याप्रकरणी शालू हातोले यांनी उरळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कारवाई होण्यासाठी त्यांनी पोलीस ठाण्याचे उंबरठेही झिजवले; मात्र तरीही कारवाई झाली नाही.
अखेर गुरुवारी शालू हातोले यांच्या संयमाचा बांध फुटला. त्यांनी गुरुवारी दुपारी उरळ पोलीस ठाण्यात कीटकनाशक घेऊनच धाव घेतली. त्यांनी पुन्हा पोलिसांकडे कारवाईची मागणी केली; मात्र पोलिसांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी विषारी औषध प्राशन केले. त्यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.