सूर्यग्रहणाशी डोळे भिडवलेल्या महिलेने सुदृढ कन्येस दिला जन्म; अंधश्रद्धेचे ग्रहण कायमचं सुटलं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 03:56 PM2020-09-22T15:56:50+5:302020-09-22T15:57:35+5:30
ग्रहण काळात जे जे करायचे नाही, ते ते सर्व या गर्भवती महिलेने धाडसाने केले. सासू सिंधुताई, पती चंदन, दीर दिपक यांचे सहकार्य आणि प्रोत्साहन मिळाले.
इस्लामपूर – अंधश्रद्धेत अडकलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी येथील सावित्रीच्या लेकीने सात महिन्याची गर्भवती असताना ग्रहणकाळात भाजी चिरली, फळे तोडली, अन्न ग्रहण केले. मांडीवर मांडी घालून बसली, सोलर चष्म्यातून तिने थेट ग्रहणात काळवंडलेल्या सूर्याशी डोळेही भिडवले. ग्रहण काळात जे करायचे नाही ते करुन दाखवत, तिने कोणतेही व्यंग नसलेल्या सुदृढ कन्येला जन्म देत या अंधश्रद्धेला मूठमाती दिली आहे.
समृद्धी चंदन जाधव असं तिचं नाव आहे. २१ जूनला सूर्यग्रहण होते, ग्रहणाचे गर्भवती महिलांवर वाईट परिणाम होतात. तिने ग्रहण लागण्यापूर्वी अंघोळ करावी, ग्रहण सुटल्यावर अंघोळ करावी. मधल्या काळात काही खाऊ-पिऊ नये, देव-धर्म जप करावा, कोणतीही हालचाल करु नये, नाही तर होणारे अपत्य व्यंगत्व घेऊन जन्माला येते अशी अंधश्रद्धा अद्याप आहे. तिला समृद्धी जाधव यांनी अंनिसच्या साथीने छेद दिला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव संजय बनसोडे, डॉ. नितीन शिंदे, प्रा. बी. आर जाधव, प्रा. तृप्ती थोरात, डॉ. प्रमोद गंगनमाले, योगेश कुदळे, प्रा. विष्णू होनमारे, अवधूत कांबळे, प्रशांत इंगळे यांनी जाधव कुटुंबियांचे प्रबोधन करत, ग्रहण काळामध्ये मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नाही, गर्भवती महिलेवर किंवा होणाऱ्या बाळावरसुद्धा कोणताही परिणाम होत नाही असा विश्वास दिला. त्यामुळे हे कुटुंबीय अंधश्रद्धा झुगारुन देण्यास तयार झाले. ग्रहण काळात जे जे करायचे नाही, ते ते सर्व या गर्भवती महिलेने धाडसाने केले. सासू सिंधुताई, पती चंदन, दीर दिपक यांचे सहकार्य आणि प्रोत्साहन मिळाले.
ग्रहणाचा मानवी जीवनावर गर्भवती महिलेवर किंबहुना तिच्या बाळावर कोणताही परिणाम होत नाही. हा माझा अनुभव आहे. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी माझे व माझ्या कुटुंबाचे प्रबोधन केल्यामुळे हे धाडसाचे पाऊल उचलू शकले – समृद्धी जाधव
अंनिसच्या पुढाकाराने येथील गर्भवती महिलेने स्वत: ग्रहण पाहिले, तिने सुदृढ कन्येला जन्म दिला आहे. त्यामुळे ग्रहणाचा मानवी जीवनावर कसलाही परिणाम होत नसल्याचं सिद्ध झाले आहे. – संजय बनसोडे, प्रधान सचिव, अंनिस
बाळाची वाढ पहिल्या तीन महिन्यातच पूर्ण होते, अशावेळी ग्रहण पाहिल्याने किंवा शारिरीक हालचाल वा कृती केल्याने बाळाला व्यंगत्व येते, ही अंधश्रद्धा आहे – डॉ. सीमा पोरवाल, प्रसूती तज्ज्ञ, इस्लामपूर