महिला आयकॉन्सना अक्षर सलाम
By admin | Published: March 21, 2016 03:13 AM2016-03-21T03:13:32+5:302016-03-21T03:13:32+5:30
एका प्रतिष्ठित महिलेने विविध क्षेत्रांत आपले भरीव योगदान केलेल्या महिलांचा केलेला सन्मान... इतर महिलांनी त्यांना दिलेली दाद... आणि एकूणच स्त्री ही शक्ती नाही तर शक्ती ही स्त्री आहे
पुणे : एका प्रतिष्ठित महिलेने विविध क्षेत्रांत आपले भरीव योगदान केलेल्या महिलांचा केलेला सन्मान... इतर महिलांनी त्यांना दिलेली दाद... आणि एकूणच स्त्री ही शक्ती नाही तर शक्ती ही स्त्री आहे, याचा उपस्थितांना आलेला प्रत्यय... असे वातावरण आज ‘लोकमत’च्या आयकॉन्स आॅफ पुणे (वुमेन) या कॉफीटेबल बुकच्या प्रकाशन सोहळ्यात होते.
‘लोकमत’च्या वतीने या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन खासदार जया बच्चन यांच्या हस्ते झाले. या वेळी लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, खासदार अॅड. वंदना चव्हाण, अमर साबळे, प्रसिद्ध लेखिका शोभा डे, यूएसके फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे, अनिल काटे एंटरप्रायझेसचे संचालक अनिल काटे, ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई, महाव्यवस्थापक मिलन दर्डा हे व्यासपीठावर उपस्थित होते.
कोणी डॉक्टर, उद्योजिका, कोणी इंटेरिअर डिझायनर, बांधकाम व्यावसायिक आणि यांसारख्या इतर अनेक क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाने स्वत:चे स्थान सिद्ध केलेल्या महिलांचा यानिमित्ताने ‘लोकमत’ने विशेष
सन्मान केला.
समाजनिर्मितीसाठी काम करणाऱ्या या महिलांचा वाटा महनीय आहे. फक्त शब्दांतून त्यांचा सन्मान न करता कृतीतून करणे अधिक सयुक्तिक वाटते आणि म्हणूनच आयकॉन्सचा सोहळा आयोजित केला आहे, अशी भावना दर्डा यांनी व्यक्त केली.
उषा काकडे म्हणाल्या, ‘‘सावित्रीबाई फुले, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली झाली. त्यामुळेच आपण घराबाहेर पडून असा मुक्त संवाद साधत आहोत. यानिमित्ताने आपण त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. त्याचबरोबर, स्व. वीणा दर्डा आणि स्व. ज्योत्स्ना दर्डा
यांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून महिलांसाठी व्यासपीठ मिळवून दिले; त्यामुळे ‘लोकमत’चे विशेष आभार मानायला हवेत.’’आर्थिक सक्षमतेनेच महिला सशक्त
पुणे : महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यावरच खण्या अर्थाने सक्षम होतील. यासाठी तिला केवळ पदवीचे शिक्षणच नाही तर संस्काराचे, व्यवहाराचे शिक्षण मिळणे गरजेचे आहे, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेत्री खासदार जया बच्चन यांनी केले.
‘लोकमत’तर्फे प्रकाशित ‘आयकॉन्स आॅफ पुणे (वुमेन) या कॉफीटेबल बुकच्य्ाां प्रकाशन प्रसंगी त्या बोलत होत्या.स्त्रीशक्तीला नमन करणे, ही आपली संस्कृती
स्त्रियांचा सन्मान करणे, ही आपली संस्कृती आहे. आजही जगाच्या पाठीवर अमेरिका, जपानसारख्या राष्ट्रांत स्त्री ही राष्ट्रपती झालेली नाही; मात्र आपल्या देशाने स्त्रीला राष्ट्रपती होण्याचा मान दिला. स्त्रीशक्तीला नमन करणे हीच आपली खरी संस्कृती आहे. समाजातील विविध स्तरांमध्ये अनेक महिला वेगवेगळ्या पद्धतींनी काम करीत असतात. त्यांच्या कार्यकर्तृत्वातून इतरांना प्रेरणा मिळत असते. त्या प्रेरणा देणाऱ्या महिलांना आयकॉन्सच्या माध्यमातून समाजासमोर आणण्याचा प्रयत्न ‘वुमेन आयकॉन्स’च्या माध्यमातून करण्यात आला आहे आणि त्या माध्यमातून स्त्रीशक्तीला नमन करण्याचा आम्हाला अभिमान वाटतो.
- खासदार विजय दर्डा,
चेअरमन, लोकमत एडिटोरियल बोर्ड जिद्द आणि ध्यासाने महिलांची भरारी
जिद्द, ध्यास आणि कष्टाची तयारी असल्याने महिला कोणत्याही क्षेत्रात भरारी घेऊ शकतात. सुधा मूर्ती यांनी ध्यासाने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. एका प्रथितयश कंपनीला त्यांच्या या ध्यासामुळेच आपले धोरण बदलून भारतातील पहिली इंजिनिअर म्हणून नोकरीवर घ्यावे लागले. अरुणिमा सिन्हा यांच्या आयुष्यातून जिद्द म्हणजे काय हे समजते. रेल्वेमध्ये चोरांशी लढताना त्यांना बाहेर फेकून देण्यात आले. रूळावर पडल्या असता दुसऱ्या गाडीखाली पाय कापला गेला. रात्रभर त्या अवस्थेत पडून राहिल्यावर अॅनेस्थेशिवाय शस्त्रक्रिया त्यांनी सहन केली. या सगळ्या संकटावर मात करीत कृत्रिम पायाच्या साहाय्याने त्यांनी एव्हरेस्ट शिखर सर केले.
- उषा काकडे, अध्यक्ष, यूएसके फाउंडेशनस्त्रियांमधील आत्मविश्वासाचे दर्शन
रॅम्प वॉकने स्त्रियांच्या आत्मविश्वासाचे दर्शन घडवले. यातून स्त्रियांमधील सीमारेषा नाहीशी झाली असून, समानतेचे दर्शनही घडले आहे. महिलांच्या भावविश्वाचे दर्शन यातून घडत आहे. प्रत्येक स्त्री ही आपापल्या पातळीवर स्वयंसिद्धा असते. त्यामुळे तिचा समान सन्मान व्हायला हवा. धडाडीने, जिद्दीने ती आजच्या काळात आपले अस्तित्व सिद्ध करत आहे. पुरुषांच्या बरोबरीने काम करत असताना घरातील जबाबदाऱ्या, हिशेब, काटकसर या बाबतींतही आघाडीवर आहे. तिच्या या क्षमतेला सलाम केलाच पाहिजे.
- शोभा डे, प्रसिद्ध लेखिका त्या आल्या, त्या चालल्या, त्यांनी जिंकले!
‘कहता है पल, खुद से निकल, जीते है पल’ अशा शब्दांत उमटलेले आत्मविश्वासाचे प्रतिबिंब, ‘आय अॅम हू आय अॅम’ असे म्हणत आपापल्या क्षेत्रांप्रमाणेच व्यासपीठ पादाक्रांत करत त्यांनी दाखवलेला अभिनिवेश, कौतुकाने आणि सन्मानाने भारावलेले उपस्थित, आयुष्यात खरेखुरे कर्तृत्व गाजवून त्यांनी सिध्द केलेला ‘हिरोइजम’ अशा वातावरणात आगळावेगळा ‘रॅम्प वॉक’ रंगला.
धडाडी आणि जिद्दीला अपार परिश्रमांची जोड देत यशाच्या शिखराला गवसणी घालणा-या स्त्रीशक्तीच्या कर्तुत्वाला यानिमित्ताने सलाम करण्यात आला. प्रत्यक्ष आयुष्यात अनेक संकटांचा सामना करुन त्यातून तावून सुलाखून बाहेर पडलेल्या, परिस्थितीशी दोन हात करुन समर्थपणे पाय रोवून उभ्या राहिलेल्या महिलांनी रॅम्प वॉकमध्ये भाग घेतला.