ट्रकच्या धडकेत महिला ठार
By admin | Published: March 4, 2016 02:23 AM2016-03-04T02:23:36+5:302016-03-04T02:23:36+5:30
डाबकी रोडवर अपघात, मुलगा जखमी; संतप्त जमावाने दगडफेक करून ट्रक पेटविला.
अकोला: शहरात वाळू घेऊन येणार्या ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने महिला जागीच ठार झाली, तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास डाबकी रेल्वे गेटजवळ घडली. अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रकवर तुफान दगडफेक करून ट्रक पेटवून दिला. पोलिसांनी ट्रकचालकास ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गायगाव येथे राहणारा विजय तुळशीराम शर्मा (२६) हा युवक त्याची आई पुष्पा तुळशीराम शर्मा (५५) यांना घेऊन एमएच ३0 एएच ४९३२ क्रमांकाच्या मोटारसायकलने अकोल्यातील एका लग्नसोहळय़ात सहभागी होण्यासाठी जात होता. याच मार्गाने अंदुरा येथून वाळूने भरलेला एमडब्लूवाय ३११८ क्रमांकाचा ट्रक जात होता. या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात विजयचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले आणि ती घसरली. पुष्पा शर्मा या मोटारसायकलवरून खाली पडून ट्रकच्या मागील चाकात आल्या. त्यांच्या अंगावरून ट्रक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. विजय हासुद्धा गंभीर जखमी झाला. त्याला सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर संतप्त झालेल्या १00 ते १५0 लोकांच्या जमावाने ट्रकवर तुफान दगडफेक केली. काहींनी डिझेल टँक दगडाने फोडून ट्रक पेटवून दिला. घटनेची माहिती डाबकी रोड पोलिसांना, मनपा अग्निशमन विभागाच्या कर्मचार्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळावर धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी राखीव पोलीस दलाच्या तुकडीला पाचारण केले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उपअधीक्षक प्रदीप चव्हाण, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश सावकार, खदानचे ठाणेदार छगनराव इंगळे, ठाणेदार शेख रफिक, अनिल ठाकरे, रामदासपेठचे ठाणेदार सुभाष माकोडे, सहायक पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे, पीएसआय पवार यांनीही घटनास्थळाला भेट दिली.