सेविका हसल्या, ताई रुसल्या! मुख्यमंत्र्यांनी दिली मेस्माला स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 05:59 AM2018-03-23T05:59:54+5:302018-03-23T05:59:54+5:30
अंगणवाडी सेविकांनी संपावर जाऊ नये म्हणून त्यांना अत्यावश्यक सेवा कायद्याच्या (मेस्मा) कक्षेत आणण्याचा महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी स्थगित केला.
मुंबई : अंगणवाडी सेविकांनी संपावर जाऊ नये म्हणून त्यांना अत्यावश्यक सेवा कायद्याच्या (मेस्मा) कक्षेत आणण्याचा महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी स्थगित केला. शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावाखाली सरकार झुकले, पण त्याचवेळी आपला निर्णय फिरविला गेल्याने पंकजा मुंडे मात्र कमालीच्या नाराज झाल्याचे कळते. स्थगितीमुळे अंगणवाडी सेविकांना दिलासा मिळाला, पण पंकजाताई मात्र रुसल्या.
या सेविकांवरील मेस्मा रद्द करण्यासाठी शिवसेना आणि विरोधी पक्षांनी बुधवारी दोन्ही सभागृहे अक्षरश: डोक्यावर घेतली होती. आजही तो
आग्रह कायम होता. त्यावर, मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मेस्माला स्थगिती देण्यात
येत असल्याचे जाहीर केले. विधान
परिषदेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवेदन दिले.
बाबा, आपण नसल्याची
जाणीव होते
पंकजा मुंडे यांनी बुधवारी शिवसेना आणि विरोधकांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना मेस्मा कायम राहील, असे निक्षून सांगितले होते. तथापि, आज मुख्यमंत्र्यांनी मेस्माला स्थगिती दिली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवेळी पंकजा सभागृहात आल्याच नाहीत. या प्रकारानंतर पंकजा यांनी फेसबुकवर ‘बाबा! आपण नसल्याची जाणीव मला सातत्याने होत असते’ अशी अत्यंत भावनिक पोस्ट टाकली. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या फोटोसह डोळे पाणावलेले बालकही त्यात दिसते.
मी नाराज
नाही - पंकजा
मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाबद्दल मी अजिबात नाराज नाही. माझ्याशी चर्चा करूनच त्यांनी निर्णय घेतला. यावरून आमच्यात कटुता आलेली नाही. माझ्या बाबांबाबत भावनिक फेसबुक पोस्ट ही मी काल रात्री टाकलेली होती. आजच्या निर्णयाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. एका मॅग्झिनने माझ्यावर विशेषांक काढला. रात्री तो वाचताना मी भावनिक झाले व ती पोस्ट टाकली. त्यामुळे आजच्या निर्णयाचा त्याच्याशी संबंध नाही. विविध बैठकांमुळे आज उपस्थित राहू शकलो नसल्याचेही त्यांनी सांगितले.